बारबाडोस : भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग अन् सूर्यकुमार यादवसह टीम इंडियानं सांघिक कामगिरीच्या जोरावर हिसकावून घेतला. भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट हार्दिक पांड्यानं घेतलेली हेनरिक क्लासेनची विकेट ठरला. यानंतर दुसरा टर्निंग पॉइंट सूर्यकुमार यादवनं घेतलेला डेव्हिड मिलरचा घेतलेला अफलातून कॅच ठरला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या असताना रोहित शर्मानं हार्दिक पांड्याकडे ओव्हरची जबाबदारी दिली होती. हार्दिकनं रोहित शर्मानं दिलेली मोहीम फत्ते केली आणि भारतानं 17 वर्षांनतर टी 20 वर्ल्ड कप विजयाचा गुलाल उधळला.
आयपीएलमधील अपयश, खासगी आयुष्यात संघर्ष पण हार्दिक लढला
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व आयपीएलमध्ये करत होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिकला अपयश आलं. मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर राहिला. याच दरम्यान हार्दिक आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या. या सर्व संकटांचा सामना करत हार्दिक पांड्या अमेरिकेच्या धर्तीवर पोहोचला. अमेरिकेत झालेल्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं भारतासाठी दमदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं आणि रोहित शर्मानं विश्वास दाखवत उपकप्तान केलं. हार्दिकनं या संधीचं सोनं केलं. कधी फलंदाजी तर कधी गोलंदाजीच्या जोरावर हार्दिक पांड्यानं भारताच्या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची कामगिरी केली.
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकडून मोहीम फत्ते
हेनरिक क्लासेननं अक्षर पटेलची ओव्हर फोडून काढली होती. हेनरिक क्लासेननं 15 व्या ओव्हरमध्ये 24 धावा काढल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या. रोहित शर्मानं 16 व्या ओव्हरमध्ये बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला. हार्दिक पांड्यानं पहिल्याच बॉलवर हेनरिक क्लासेनची विकेट काढली. भारतानं याच ठिकाणी मॅचमध्ये कमबॅक केलं.
रोहित शर्मानं पुन्हा एकदा 20 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग हार्दिक पांड्याकडे दिली. हार्दिक पांड्याची बॉलिंग आणि सूर्यकुमार यादवची अफलातून फिल्डींग या जोरावर डेव्हिड मिलरला बाद करण्यात भारताला यश आलं. डेव्हिड मिलर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाद झाला अनं भारतानं विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण केलं. पुढं भारतानं सात धावांनी मॅच जिंकली. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकताच हार्दिक पांड्यानं आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
संबंधित बातम्या :
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स