Jay Shah ICC: आयसीसीचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह (Jay Shah) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ संपत आहे आणि काल ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास रोहन जेटली यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड होऊ शकते. 


एका वृत्तानुसार, रोहन जेटली (Rohan Jaitly) हे बीसीसीआयचे (BCCI) नवीन सचिव होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. रोहन जेटली यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले आहे. तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह इतर अधिकारी त्यांच्या पदावर कायम राहतील. रोहन जेटली हे 2020 मध्ये प्रथमच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाला. यानंतर त्यांनी 2021 मध्ये विकास सिंग यांचा पराभव करून दोनदा विजय मिळवला. 


सचिवपदाच्या शर्यतीत रोहन जेटली आघाडीवर-


रोहन जेटली हे भारतीय जनता पक्षाचे माजी दिग्गज नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. रोहन जेटली हे दोन वेळा डीडीसीएचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना क्रीडा प्रशासक म्हणून चांगला अनुभव आहे. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहनच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लीगमध्ये ऋषभ पंत आणि इशांत शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 


जय शाह होणार ICC चे पुढील अध्यक्ष?


बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित आहे. रिपोर्टनुसार, जवळपास सर्व आयसीसी सदस्य जय शाहच्या समर्थनात आहेत. आयसीसीच्या 16 पैकी 15 सदस्य जय शाहच्या समर्थनात आहेत. जय शाह यांच्या आधी भारताच्या चार दिग्गजांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.


2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सामील-


जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.


जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास इतिहास रचणार-


जय शाह वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत, ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर 3 वर्षे राहतील.


संबंधित बातमी:


'नीरज चोप्रा नव्हे...या क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवायचाय'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!