एका वृत्तानुसार, जय शाह यांच्यानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली (Rohan Jaitley) यांना बीसीसीआयचे सचिव बनवले जाऊ शकते. रोहन जेटली यांच्याशिवाय गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांचेही नाव बीसीसीआय सचिव होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, या पदासाठी रोहन जेटली हेच नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहे रोहन जेटली?
रोहन जेटली हे दिवंगत राजकारणी आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत आणि सध्या ते दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रोहन जेटली हे 2020 मध्ये प्रथमच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी 2021 मध्ये विकास सिंग यांचा पराभव करून दोनदा विजय मिळवला. रोहन जेटली यांना क्रीडा प्रशासक म्हणून चांगला अनुभव आहे. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहनच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लीगमध्ये ऋषभ पंत आणि इशांत शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
जय शाह यांची बिनविरोध निवड-
आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी जय शाह यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. जय शाह यांच्या उमेदवारीला 16 पैकी 15 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत.