Ritika Sajdeh Post For Rohit Sharma: भारतीय संघाने 2 जून रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. विराट कोहली, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी भारतासाठी निर्णायक कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत कोणत्याही एका खेळाडूवर विसंबून नसल्याचे दाखवून दिले. विराट कोहलीला सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.
विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या या निर्णयानं सर्वांना धक्काच बसला. यादरम्यान आता रोहित शर्माची पत्नी रितिकी सजदेह हिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. रो, मला माहित आहे की या ट्रॉफीचं तुझ्यासाठी महत्व काय आहे. हा फॉरमॅट, हा चषक, हे लोक, हा प्रवास आणि ती ट्रॉफी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही नेहमीच स्वप्न पाहिले होते. मला माहित आहे की हे गेले काही महिने तुझ्यासाठी किती कठीण गेले आहेत. तुझ्या हृदयावर, मनावर आणि शरीरावर याचा किती परिणाम झाला हे मला माहीत आहे, पण तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना पाहणे भावनिक आणि प्रेरणादायी होते. (Ritika Sajdeh emotional Instagram post for Rohit Sharma)
मला खूप वाईट वाटलं...
तुझी पत्नी या नात्याने...तू जे साध्य केले आहेस आणि या खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांवर तू ज्या प्रकारे प्रभाव पाडला आहेस...याचा खूप अभिमान वाटतो. पण तु हा फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतल्याने मला खूप वाईट वाटलं. परंतु म माहित आहे की हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही या संघासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे याचा खूप विचार केला आहे, परंतु तरीही तुला या फॉरमॅटपासून दूर जाताना पाहणे सोपे जाणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तुला माझे म्हणवण्याचा खूप अभिमान वाटतो, असं रितिका पोस्टद्वारे म्हणाली.
अनुष्का शर्मा काय म्हणाली?
आमच्या मुलीने सर्व खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. त्यामुळे ती भावूक झाली आहे आणि त्यांना मिठी मारण्यासाठी कोणीतरी असेल ना असा प्रश्न पडला आहे. होय, माझी प्रिय मुलगी, त्यांना 1.5 अब्ज लोकांनी मिठी मारली आहे. किती अभूतपूर्व विजय आणि किती महान कामगिरी!! चॅम्पियन्स – अभिनंदन!!, अशी पोस्ट अनुष्का शर्माने टीम इंडियाच्या विजयानंतर टाकली आहे. या पोस्टखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
विराट, रोहित आणि जडेजाने घेतली निवृत्ती-
2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सर्वात आधी कोहलीने सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.