(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishabh Pant Century : वादळी शतकी खेळीनंतर पंतच्या नावावर तीन मोठ्या विक्रमांची नोंद, सचिन-कोहलीच्या पंक्तीत स्थान
England vs India : ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
Rishabh Pant Century England vs India Edgbaston : बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटीमध्ये ऋषभ पंत याने दमदार शतकी खेळी केली. भारतीय संघाचा डाव कोसळला असताना पंत आणि जाडेजाने तुफानी फलंदाजी केली. ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. बर्मिंगहममध्ये शतक झळकावणारा ऋषभ पंत तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावावर होता. या यादीत आता ऋषभ पंत याच्या नावाचाही समावेश झालाय. या विक्रमाशिवाय पंतने इतर विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
बर्मिंगहम कसोटीत शतक झळकावत ऋषभ पंतने सचिन आणि विराटच्या यादीत स्थान पटकावले. त्याशिवाय, इंग्लंडमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजामध्ये ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. ऋषभ पंतने आज 89 चेंडूत शतक खेळी केली. या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीन अव्वल स्थानावर आहे. अजहरने 1990 मध्ये 88 चेंडूत शतक झळकावले होते.
इंग्लंडमध्ये वेगवान शतक झळकावणारे भारतीय -
88 चेंडू- मोहम्मद अज़हरूद्दीन, लॉर्ड्स 1990
89 चेंडू- ऋषभ पंत, बर्मिंगहम 2022
117 चेंडू- ऋषभ पंत, ओवल 2018
118 चेंडू- केएल राहुल, ओवल 2018
130 चेंडू- कपिल देव, ओवल 1990
100 षटकार ठोकणारा पंत सर्वात तरुण भारतीय -
पंत 24 वर्षे 271 दिवसांचा असतानाच 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले आहेत. याआधी 25 वर्षाचा असताना सचिनने हा रेकॉर्ड केला होता. पण आता हा रेकॉर्ड पंतच्या नावे झाला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर सुरेश रैना असून त्याने 25 वर्षे 77 दिवसांचा असताना 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते. याशिवाय 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करण्यासाठी पंतने 116 सामने खेळत दुसरा क्रमांक गाठला आहे. याआधी हार्दिकने 101 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 षटकार पूर्ण केले आहेत. यादीत तिसऱ्या स्थानावर केएल राहुल असून त्याने 129 सामन्यांत 100 षटकार पूर्ण केले आहेत.
सर्वात कमी सामन्यांत 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण कऱणारे भारतीय
- 101 - हार्दिक पांड्या
- 116 - ऋषभ पंत
- 129 - केएल राहुल
- 132 -एम एस धोनी
- 166 - सुरेश रैना
- 166 - रोहित शर्मा