India vs New Zealand 3rd Test : वानखेडे मैदानावर ऋषभ पंतने आपल्या झंझावाती फलंदाजीने दिवाळी पाडव्याला धमाका केला. कसोटी क्रिकेटमध्ये टी-20 शैलीत खेळताना पंतने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 8 चौकार आणि 2 षटकार मारत भारतीय यष्टीरक्षकाने अवघ्या 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही खेळाडूने झळकावलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. पंतने पृथ्वी शॉचा विक्रम मोडीत काढला आहे.
ऋषभ पंतने कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात धमाकेदार केली. पहिल्याच षटकात पंतने एजाज पटेलविरुद्ध एकापाठोपाठ तीन चौकार मारले. किवी फिरकीपटू भारतीय यष्टीरक्षकासमोर पाणी मागताना दिसले. शानदार फलंदाजी करत पंतने अवघ्या 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी पंतने 59 चेंडूंचा सामना करत 60 धावांची दमदार खेळी केली. या डावात डावखुऱ्या फलंदाजाने 8 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार ठोकले.
वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडला
ऋषभ पंतने भारताकडून खेळताना न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. पंतने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने पृथ्वी शॉचा विक्रम मोडीत काढला आहे. शॉने पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात किवी संघाविरुद्ध 41 चेंडूत अर्धशतक केले होते.
गिलसोबत महत्त्वाची भागीदारी
शुभमन गिलसह ऋषभ पंतने भारतीय डाव शानदारपणे हाताळला. आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे पंतने गिलवर फारसे दडपण येऊ दिले नाही. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीत गिलचे योगदान 35 आणि पंतचे योगदान 60 धावांचे होते. पंतने विशेषत: न्यूझीलंडच्या फिरकीपटूंचा समाचार घेतला आणि आपल्या संपूर्ण डावात त्यांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. गिल-पंतच्या भागीदारीमुळे भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आहे.
दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर संपला. या बाबतीत भारत अजूनही 40 धावांनी मागे आहे. सध्या शुभमन गिल 70 धावांवर नाबाद असून रवींद्र जडेजा 10 धावांवर नाबाद आहे. भारताकडून सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन यांना फलंदाजी करायची बाकी आहे. उपाहारानंतर भारतीय संघ न्यूझीलंडवर मोठी आघाडी मिळविण्याकडे लक्ष देईल.
हे ही वाचा -