Gujarat Giants Women vs Royal Challengers Bengaluru Women, 1st Match : महिला प्रीमियर लीग 2025 च्या पहिल्या सामन्यात धावांचा इतका पाऊस पाडला की त्याने अनेक विक्रम मोडले. रिचा घोष व कनिका अहूजा या जोडीने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी मौल्यवान कामगिरी केली. गुजरात जायंट्स संघाकडून मिळालेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चार बाद 109 धावा अशा अवस्थेत असलेल्या बंगळूरसाठी दोघींनी महत्त्वाचे प्रदर्शन केले आणि सामन्याला कलाटणी दिली. रिचा हिने 27 चेंडूंमध्ये नाबाद 64 धावांची, तर कनिका हिने 13 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावांची खेळी केली. सलामीच्याच लढतीत बंगळूरने 6 विकेट व 9 चेंडू राखून गुजरातला पराभूत केले आणि विजयाचा श्रीगणेशा केला.
पहिल्या सामन्यात बंगळूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या बेथ मुनी व लॉरा वॉलवॉर्ड्स या जोडीने पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली; पण रेणुका सिंग हिने लॉरा हिला सहा धावांवर बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर कनिका अहजाने दयालन हेमलता हिला 4 धावांवर बाद केले.
बेथ मुनी व अॅशले गार्डनर या जोडीने बंगळूरच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. बेथ मुनी हिने 42 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी साकारली. या खेळीत तिने आठ चौकार मारले. प्रेमा रावत हिने बेथ मुनी हिला बाद करीत मोठा अडसर दूर केला. अॅशले गार्डनर हिने 37 चेंडूंमध्ये नाबाद 79 धावांची फटकेबाजी केली. तिने आपली खेळी तीन चौकार व आठ षटकारांनी सजवली. गुजरात संघाने 20 षटकांत पाच बाद 201 धावा फटकावल्या.
रिचा घोषला मिळाला सामनावीराचा पुरस्कार
गुजरात जायंट्सकडून विजय हिसकावून लावणारी रिचा घोष 'सामनावीर' म्हणून निवडली गेली. आरसीबीच्या या स्टार रिचा घोषने 27 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची तुफानी खेळी केली.
बंगळूरविरुद्ध गुजरात सामन्यात अनेक विक्रम मोडले
बंगळूरविरुद्ध गुजरात यांच्यातील पहिल्या सामन्यात विक्रम मोडले गेले. WPL च्या इतिहासात इतर कोणत्याही सामन्यात यापेक्षा जास्त धावा झाल्या नव्हत्या. या सामन्यात एकूण 403 धावा झाल्या. यापूर्वी 2023 मध्ये या दोन्ही संघांमधील सामन्यात 391 धावा झाल्या होत्या. याशिवाय या सामन्यात एकूण 16 षटकार आणि 41 चौकार मारण्यात आले. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात एका सामन्यात मारण्यात आलेले हे दुसरे सर्वाधिक षटकार आहेत. आरसीबी विरुद्ध डीसी सामन्यात सर्वाधिक षटकार (19) लागले.
WPL च्या इतिहासात हे दुसरेच वेळा आहे जेव्हा 4 खेळाडूंनी एकाच सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आरसीबी विरुद्ध जीजी सामन्यात बेथ मुनी, अॅशले गार्डनर, एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अर्धशतके झळकावली.