New Zealand Champions Trophy 2025 : आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरू होणार आहे, ही स्पर्धा पुढील आठवड्यात 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. पण ती सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांचे खेळाडू जखमी होत आहेत. आता न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचा गोलंदाज बेन सीयर्स दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

न्यूझीलंडने सीयर्सच्या जागी जेकब डफीचा संघात समावेश केला आहे. तो पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेचा भाग आहे. दुखापतीमुळे सीयर्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या स्नायूंमध्ये ताण आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली. बोर्डाने म्हटले आहे की, बेन सीयर्सला दुखापत झाली आहे. यामुळे, सीयर्स 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. सीयर्सच्या डाव्या पायात समस्या आहे. तो कराचीमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघासोबत सराव करत होता. बुधवारी सराव करताना सीयर्सला त्रास होत असल्याचे दिसून आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी किमान 2 आठवडे लागतील.

बोर्डाकडून बदलीची घोषणा!

सीयर्सला वगळल्यानंतर न्यूझीलंडने जेकब डफीला संघात समाविष्ट केले आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडकडून 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात डफीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात 41 धावा देऊन 3 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. डफीने 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत.

तिरंगी मालिकेत न्यूझीलंडची प्रभावी कामगिरी!

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानमध्ये आहे. येथे एक त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 87 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. आता अंतिम फेरीत तिचा सामना पाकिस्तानशी होईल. शुक्रवारी कराची येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना खेळला जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ - डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, केन विल्यमसन, विल यंग, ​​मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, विल ओ'रोर्क, टिम साउथी.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेले स्टार खेळाडू! 

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून अनेक मोठ्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे, ज्यात जसप्रीत बुमराह, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स सारखे खेळाडूंचा समावेश आहे. दुखापतींमुळे अँरिक नोर्किया, गेराल्ड कोट्झिया, सॅम अयबू, जेकब बेथेल हे देखील स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

हे ही वाचा -

Champions Trophy Prize Money : चॅम्पियन्स ट्रॉफीत A टू Z संघावर होणार पैशांची बरसात; तळ्यात असणाऱ्या टीमवरही कोट्यवधी रुपयांची उधळण