Ravi Ashwin On Rohit Sharma : नुकत्याच झालेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा 4-1 च्या फरकाने धुव्वा उडवला. या मालिकेत आर. अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्यानं 24.81 च्या सरासरीने 26 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडविरोधातील मायदेशातील कसोटी मालिका अश्विनसाठी सोपी नव्हती. एकीकडे देशसेवा तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी. राजकोट कसोटी सुरु असतानाच अश्विनला अचानक चेन्नईला घरी जावं लागलं. कारण, आई रुग्णालयात उपचार घेत होती. वैयक्तीक आयुष्यात संकटाचा डोंगर उसतानाही अश्विननं शानदार कामगिरी केली. अश्विनच्या यशामध्ये रोहित शर्माचाही मोठा वाटा आहे. अश्विनच्या कठीण प्रसंगात रोहित शर्मानं त्याला साथ दिली होती. अश्विन यानेही रोहित शर्माचं आता तोंडभरुन कौतुक केलेय.
अश्विननं केले रोहित शर्मचं तोंडभरुन कौतुक -
फिरकीपटू आर. अश्विन यानं भारतीय कर्णधार रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलेय. रोहित शर्मा अतिशय स्वच्छ मनाचा व्यक्ती आहे. एखाद्या व्यक्तीनं पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं असेल. पण देव त्याला काहीही सहजासहजी देत नाही, असे अश्विन म्हणाला. त्यानं रोहित शर्मावर कौतुकाचा पाऊस पाडला. " रोहित शर्माला जे मिळालं, त्यापेक्षा जास्त मिळायला हवं होतं. देव त्याला नक्कीच खूप काही देईल. स्वार्थी समाजात एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे दुर्मिळ असते, पण रोहित शर्मा ही अशी व्यक्ती आहे, असेही तो म्हणाला.
अश्विनसाठी रोहित शर्मानं चार्टर प्लेन केले बूक -
आईच्या प्रकृतीबद्दल समजताच अश्विन ढसाढसा रडत होता. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल यांनी त्याला धीर दिला. रोहित शर्मा इतक्यावरच थांबला नाही, त्यानं अश्विनसाठी चार्टर प्लेनची व्यवस्थाही केली. अश्विनने याबाबत नुकताच खुलासा केला.
आईच्या प्रकृतीबद्दल समजताच अश्विन ढसाढसा रडत होता. अश्विन म्हणाला की, आईबद्दल समजल्यानंतर राजकोट ते चेन्नईची फ्लाइट शोधायला सुरुवात केली, पण त्याला कोणतीही फ्लाइट सापडली नाही. राजकोट विमानतळ संध्याकाळी 6 वाजता बंद होते. आता काय करावे ते समजत नव्हते. त्याचवेळी रोहित आणि द्रविड त्याच्या खोलीत आले. दोघांनी अश्विनला धीर दिला अन् घरी जाण्यास सांगितले. अश्विनने सांगितले की, त्यावेळी राजकोटहून विमान नव्हते. अशा परिस्थितीत रोहितने जे काही केले त्याने सर्वांची मने जिंकली. रोहितने चार्टर प्लेन बूक केले.
अश्विनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल -
आर. अश्विन यानं आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना रोहितवर कौतुकाची थाप टाकली. त्याने भारत-इंग्लंड कसोटी मालिका आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल आपले मत व्यक्त केले. अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स अश्विनच्या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.