Musheer Khan Broke Sachin Tendulkar Record: मुंबईला मुंबईत हरवायचं आणि रणजी करंडक जिंकायचं हे स्वप्न साकार करण्यासाठी विदर्भासमोर तब्बल 538 धावांचं आव्हान आहे. त्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भानं रणजी करंडक फायनलच्या तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 10 धावांची मजल मारली. त्याआधी, मुंबईनं दुसऱ्या डावात 418 धावांची मजल मारली. नव्या दमाच्या मुशीर खाननं झळकावलेलं शतक आणि त्याला अजिंक्य रहाणे-श्रेयस अय्यरनं दिलेली साथ मुंबईच्या डावात निर्णायक ठरली. मुशीरनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी रचली. मुशीर खाननं दहा चौकारांसह 136 धावांची, तर अजिंक्य रहाणेनं पाच चौकार आणि एका षटकारासह 73 धावांची खेळी उभारली. श्रेयस अय्यरचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. त्याच्या 95 धावांच्या खेळीला 10 चौकार आणि तीन षटकारांचा साज होता.


रणजी चषकाच्या फायनलमध्ये मुशीर खान यानं 326 चेंडूचा सामना करत 136 धावांची शतकी खेळी केली. या शानदार शतकी खेळीसह मुशीर खान यानं सचिन तेंडुलकरचा 29 वर्ष जुना विक्रम मोडल. विशेष म्हणजे, त्यावेळी सचिन तेंडुलकर स्टेडियममध्येच होता. मुशीर खान यानं 19 वर्ष 14 दिवसांचा असताना रणजी चषकाच्या फायनलमध्ये शतक ठोकलं. याआधी हा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. सचिनने 22 व्या वर्षी पंजबविरोधात शतक ठोकलं होता. आज हा विक्रम मोडीत निघाला. 






सचिन तेंडुलकरसमोरच 29 वर्ष जुना विक्रम मोडला - 


वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यातील अंतिम सामना सुरु आहे. या सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरशिवाय रोहित शर्माही उपस्थित होता. मुशीर खान यानं सचिन तेंडुलकरसमोरच त्याचा 29 वर्ष जुना विक्रम मोडला. हा सामना पाहण्यासाठी मुशीर खानचे वडील नौशाद खानही स्टेडियममध्ये उपस्थित होते. मुशीर खानच्या शतकानंतर वडील नौशाद खान यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.  






रणजी ट्रॉफीमध्ये मुशीरचा शानदार फॉर्म -


अंडर 19 विश्वचषकात शनदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खान यानं रणजी चषकातही प्रभावी कामगिरी केली. रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामातील मुशीर खान प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. मुशीर खानने उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक झळकावले. यानंतर उपांत्य फेरीत पन्नास धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर आता  विदर्भाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत शतक झळकावून मुंबईला संकटातून बाहेर काढले. मुशीर खानच्या शतकामुळे मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावा केल्या.