मुंबई : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक देशांमध्ये वर्णभेदाविरोधात निषेध केला जात आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. क्रिकेट विश्वातही वर्णभेदी टिप्पणी झाल्याबाबत काही क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने याबाबत भाष्य केलं आहे. धर्माच्या आधारावर वर्णभेद हा मुद्दा त्याने मांडला आहे.


129 एकदिवसीय, 29 कसोटी आणि 24 ट्वेण्टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व करणाऱ्या इरफान पठाणने मंगळवारी (9 जून) एक ट्वीट केलं होतं, ज्यात त्याने धर्माच्या आधारावर वर्णभेदाचा मुद्दा उपस्थित केला होता. धर्म पाहून घर खरेदी करु न देणं हा देखील वर्णभेद असल्याचं त्याने म्हटलं आहे.





35 वर्षीय इरफानने ट्वीट केलं आहे की, 'वर्णभेद हा केवळ कोणाच्या रंगाशी जोडलेला नाही. एखाद्या सोसायटीमध्ये धर्म पाहून घर खरेदी करु न देणं हा देखील वर्णभेदाचाच भाग आहे." त्याचं हे ट्वीट आतापर्यंत हजारो लोकांना लाईक आणि रिट्वीट केलं आहे. मात्र काही ट्विपल्सने इरफानच्या या ट्वीटचा विरोधही केला आहे.


इरफानच्या आधी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी तसंच धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही वर्णभेदावर भाष्य केलं आहे. "आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात असताना माझ्याविरोधात वर्णभेदी टिप्पणी करण्यात आली होती," असा आरोप डॅरेन सॅमीने केला होता. संघातील सहकारी आपल्याला कालू नावाने हाक मारायचे. पण मला कालू शब्दाचा अर्थ समजल्यावर फारच धक्का बसला. डॅरेन सॅमीने याबाबत व्हिडीओ शेअर करुन सनरायझर्स हैदराबाद संघातील खेळाडूंनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.





काय आहे प्रकरण?
मिनेपॉलिसमध्ये 26 मे रोजी पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका व्यक्तीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. एका श्वेतवर्णीय पोलिसाने रस्त्यावर आपल्या गुडघ्याने फ्लॉईडची मान सुमारे आठ मिनिटं दाबून ठेवली होती. यानंतर हळूहळू फ्लॉईडच्या हालचाली बंद होत गेल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये 40 वर्षीय पोलिसाकडे सातत्याने गुडघा बाजूला काढण्याची विनंती करत होता. यावेळी आजूबाजूला गर्दी जमा झाली. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यानतंर श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी (29 मे) अटक करण्यात आली. त्याच्यावर थर्ड डिग्री हत्या आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आता हा हिंसाचार यांमुळे अमेरिकेतील वातावरण अशांत झालं आहे. तसेच वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सीसह अमेरिकेच्या 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेत सध्या सुरु असलेला हिंसाचार मागील अनेक दशकांपासूनचा सर्वात मोठा हिंसाचार मानला जात आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा हिंसाचार अमेरिकेतील कमीत कमी 140 शहरांपर्यंत पसरला आहे.