मुंबई : कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या अडिच महिन्यांपासून क्रिकेटला ब्रेक लागला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यादरम्यान, जगभरातील क्रिकेटर्स सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या फॅन्सशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच अनेक क्रिकेटर्सनी आश्चर्यकारक खुलासेही केले आहेत. आता यामध्ये इंग्लंडचा माजी गोलंदाज टिम ब्रेसनन याचाही समावेश झाला आहे.


मला आणि अम्पायर रॉड टकरला दिली होती जीवे मारण्याची धमकी : ब्रेसनन


ब्रेसननने यार्कशायर क्रिकेट कवर्स ऑफ पॉडकास्टमध्ये बोलताना खुलासा केला की, 2011मधील कसोटी सामन्यात खेळताना सचिन तेंडुलकरला एलबीडब्ल्यू बाद केल्यानंतर त्याला आणि अम्पायर रॉड टकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 शतकं पूर्ण करू शकत होता. परंतु, 91 धावांवर ब्रेसननने सचिनला एलबीडब्ल्यू बाद केलं होतं. परंतु, हा अत्यंत कठीण निर्णय होता. कारण टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टम्पच्या वरच्या बाजूला स्पर्श करुन गेल्याचं दिसलं होतं.


ब्रेसननने सांगितलं आहे की, 'या टेस्ट सीरिजमध्ये रिव्ह्यू नव्हता, कारण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड तेव्हा याच्या विरोधात होतं. तो कसोटी मालिकेतील शेवटचा सामना होता. जो ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला होता. सचिनने त्यावेळी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 99 शतकं ठोकली होती. ज्या चेंडूवर सचिन बाद झाला होता, ती लेग स्टंपच्या बाहेर जात होती. परंतु, अम्पायर टकरने सचिनला बाद असल्याचं सांगितलं. त्यावेळी सचिन 80 की, 90 धावांवर फलंदाजी करत होता. निश्चितपणे सचिनने त्या सामन्यात शतक झळकावलं असतं. सचिन बाद झाल्यानंतर आम्ही ती सीरिज जिंकलो, पण त्याचसोबत आम्ही अव्वलही होतो.'


टकर यांनी पोलीस सुरक्षा घ्यावी लागली : ब्रेसनन


इंग्लंडसाठी 23 कसोटी, 85 एकदिवसीय सामने आणि 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या ब्रेसननने पुढे बोलताना सांगितलं की, त्याला आणि अम्पायर रॉड टकर यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती.


त्याने सांगतिलं की, 'सचिनला बाद केल्यानंतर आम्हा दोघांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. धमक्यांचं सत्र बरेच दिवस सुरु राहिलं. अम्पायर टकर यांच्या घरी लोक धमक्यांची पत्र पाठवत होते. तसेच त्यांना प्रश्नही विचारत होते की, त्यांनी सचिनला कसं आऊट दिलं? काही महिन्यांनी जेव्हा आमची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, वाढणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना पोलीस सुरक्षा घ्यावी लागली होती. त्यांना ऑस्ट्रेलियात पोलीस सुरक्षा घ्यावी लागली होती.'


संबंधित बातम्या : 


न्यूड फोटो शेअर करुन हसीन जहांने केलेल्या आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर...


हार्दिक पंड्या बाबा होणार! लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना दिली गुड न्यूज


लॉकडाऊनमुळे मिळालेला सक्तीचा ब्रेक क्रिकेट खेळाडूंचं करिअर वाढवू शकतो : पीटरसन