Prithvi Shaw: मुंबई निवड समितीने आगामी रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू पृथ्वी शॉ याला मुंबई रणजीच्या संघातून वगळ्यात आले आहे. खराब फिटनेसमुळे मुंबई निवड समितीने पृथ्वी शॉला आगामी रणजी सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा संघ 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान त्रिपुराविरुद्ध खेळणार आहे. मुंबई संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपवण्यात आले असून श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना मुंबई संघात कायम ठेवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनूसार, निवडकर्त्यांनी पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या प्रशिक्षकांनी दोन आठवड्यांसाठी तयार केलेल्या फिटनेस नियम पाळण्यास सांगितले आहे. टीम मॅनेजमेंटने एमसीएला दिलेल्या अहवालात पृथ्वी शॉच्या शरीरात 35 टक्के वजन जास्त (चरबी वाढली) असल्याचे सांगितले आहे आणि संघात पुनरागमन करण्याआधी कठोर प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगत वजन कमी करण्यास अहवालात सांगितले आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या दोन रणजी सामन्यांमध्ये पृथ्वी शॉने चार डावांत अनुक्रमे 7, 12, 1 आणि 39 धावा केल्या आहेत. 


इराणी ट्रॉफीमध्ये 76 धावा-


पृथ्वी शॉ जुलैमध्ये बंगळुरूमध्ये मुंबईच्या कंडिशनिंग कॅम्प आणि चेन्नईमध्ये बुची बाबू ट्रॉफीला उपस्थित राहू शकला नाही. त्याने इराणी ट्रॉफीच्या दुसऱ्या डावात शेष भारताविरुद्ध 76 धावा करून देशांतर्गत हंगामाची सुरुवात केली. तो सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईचा संघ चॅम्पियन ठरला. गतविजेत्या मुंबईचे दोन सामन्यांत सहा गुण झाले असून ते सध्या अ गटात चौथ्या स्थानावर आहे.


अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद-


एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पृथ्वीला पुन्हा संघात निवड होण्यापूर्वी सराव करणे आणि वजन कमी करणे आवश्यक आहे. त्याचे वजन वाढल्याने संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी आणि शार्दुल ठाकूर देखील सामना खेळणार आहेत तर सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यातून बाहेर आहे.


रणजी ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्यासाठी मुंबईचा संपूर्ण संघ: 


अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धांत अधाट्रोव (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, हिमांशू सिंह, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.


संबंधित बातमी:


Ind vs Aus: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, इशान किशनचं कमबॅक