(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अफगाणिस्तान-पाकिस्तान मालिकेवर तालिबानची टांगती तलवार; पीसीबीकडून महत्वाचा निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड थांबवली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे मालिकेबाबतची परिस्थिती स्पष्ट नाही.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशातील क्रिकेटच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेवर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा आणि शनिवारी लाहोरमध्ये सुरू होणाऱ्या सराव शिबिराला स्थगिती दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तान गेल्या दोन दशकांतील सर्वात भीषण संकटातून जात आहे. पीसीबी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मालिकेच्या निश्चितीची वाट पाहत आहे. ही मालिका 3 सप्टेंबरपासून श्रीलंकेत खेळली जाणार आहे. एसीबीच्या वतीने श्रीलंका बोर्ड मालिका आयोजित करत आहे.
अधिकारी म्हणाले की, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप त्यांचे खेळाडू काबुलहून कोलंबोला कधी रवाना होतील याची पुष्टी केली नाही. ते म्हणाले, "संपूर्ण मालिकेचा प्रवास आराखडा आणि वेळापत्रक मिळाल्यानंतरच शिबिराचे आयोजन केले जाईल आणि संघाची घोषणा केली जाईल."
हवाई प्रवासाची परिस्थिती स्पष्ट नाही
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेबाबत कोणतेही विधान केलेले नाही. एसीबी तालिबान आणि अमेरिकन सैन्य यांच्याशी काबुल विमानतळावरून उड्डाणे चालवण्यासंदर्भात चर्चा करत आहे. श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेबाबत परिस्थिती कधी स्पष्ट होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही.
तालिबानचा कब्जा असूनही अफगाणिस्तानमध्ये देशांतर्गत टी -20 लीग होणार
अफगाणिस्तानचे स्टार खेळाडू रशीद खान आणि मोहम्मद नबी सध्या इंग्लंडमध्ये आहेत. हे खेळाडू श्रीलंकेत कसे पोहचतील यावरही परिस्थिती स्पष्ट नाही. याशिवाय जर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटवर बंदी घातली तर त्या देशाला आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व गमवावे लागू शकते.
तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. हजारो लोक देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानबद्दल जगभरात चर्चा आहेत. दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) सर्वांना चकीत करणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान काबूल क्रिकेट स्टेडियमवर घरगुती टी -20 स्पर्धा शपागीजा क्रिकेट लीग आयोजित करण्याची घोषणा केली आहे.