India vs Pakistan Champions Trophy 2025 : पुढील वर्षीच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा थरार पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. पासीबीला आशा आहे की, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षीच्या सुरुवातीला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुख म्हणजेच पीसीबीचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांना पूर्ण आशा आहे की ते जे विचार करत आहेत ते होईल.


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असून भारतीय क्रिकेट संघासह सर्व संघ या स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसिन नक्वी यांनी व्यक्त केला आहे. पीसीबीने आतापर्यंत केलेल्या तयारीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारी 19 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. जर आपण फायनलबद्दल बोललो तर तो 9 मार्च रोजी खेळला जाऊ शकतो. पीसीबीने यासाठी ठिकाणेही निश्चित केली आहेत. या सामन्यांसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडीची निवड करण्यात आली आहे. भारतासह सर्व संघांचे यजमानपद भूषवण्यास पाकिस्तान तयार असून वेळापत्रकानुसार तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 


भारताने 2008 मध्ये केला शेवटचा पाकिस्तान दौरा


आयसीसीने यावेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. पाकिस्तानने त्याचे वेळापत्रक तयार करून ते आयसीसीकडे पाठवले असल्याचे सांगितले जात आहे, मात्र आयसीसीने अद्याप ते जाहीर केलेले नाही. याचे कारण बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप सहमती दर्शवलेली नाही. भारतीय क्रिकेट संघ प्रत्येक परदेश दौऱ्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेतो, असे बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे, परंतु अद्यापपर्यंत सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नाही. टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते, तेव्हापासून टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर मालिका बंद आहे, परंतु हे दोन संघ आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. बहुतेक प्रसंगी हे सामने दुसऱ्या देशात होतात. मात्र, 2023 साली भारतात वनडे वर्ल्ड कप झाला तेव्हा पाकिस्तानी संघ भारतात आला होता. याआधी पाकिस्तानला आशिया कप 2023 चे आयोजन करण्याची संधीही मिळाली होती, मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर हायब्रीड मॉडेलवर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असेच काही घडेल अशी आशा आहे. मात्र, अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करावी.