World Cup 2023, Pat Cummins Reaction : श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजयाचे खाते उघडले आहे. तीन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण आता ऑस्ट्रेलियाच्या विजयाची गाडी पटरीवर परतली आहे. विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. विश्वचषकात ऑस्ट्रेलेयाने श्रीलंकेचा नवव्यांदा पराभव केला आहे. श्रीलंकाचा पराभव केल्यानंतर पॅट कमिन्स याने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे.  पॅट कमिन्सने म्हणाला की, मागील दोन पराभवांबाबत मला फारसे बोलायला आवडणार नाही. पण आजच्या सामन्यात आमच्या खेळाडूंनी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. श्रीलंकेच्या संघाने शानदार सुरुवात केली होती. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आमच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. 


विजयानंतर पॅट कमिन्स काय म्हणाला ??


पॅट कमिन्स म्हणाला की, "आमच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर त्यांनी मारा केला. लखनौच्या इकाना स्टेडिअमची खेळपट्टीवर 300 धावांचा स्कोर आव्हानात्मक होता. श्रीलंकेच्या फलंदाजांनी तशी सुरुवातही केली होती. पण आमच्या गोलंदाजांनी त्यांना रोखलं. चाहते मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी आले होते. त्यांचा सपोर्टही मिळाला. चाहत्यांच्या आवाजाचा आमच्यावर फारसा फरक पडला नाही. कारण, तो खेळाचाच भाग आहे. आजच्या सामन्यात आमच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला. आगामी सामन्यांमध्ये आम्हाला उत्कृष्ट खेळ कायम ठेवायचा आहे." दरम्यान पाकिस्तानचा पुढील सामना 20 ऑक्टोबर रोजी बेंगळुरु येथे पाकिस्तानविरोधात होणार आहे. 


ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय - 


श्रीलंकेचा पाच विकेटने पराभव करत ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले आहे. श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने पाच विकेट 35.2 षटकात पार केले. जोश इंग्लिंश आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतकी खेळी केली.  मिचेल मार्श याने 51 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. जोश इंग्लिंश याने झंझावती अर्धशतक ठोकले. त्याने एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 59 चेंडूत 58 धावांची खेळी केली. लाबुशेन याने 60 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. मॅक्सवेल याने 21 चेंडूमध्ये दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. तर मार्कस स्टॉयनिस याने एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 20 धावांचे योगदान दिले. श्रीलंकाकडून दिलशान मधुशंका याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.