ODI World Cup 2023 : बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला शनिवारी विश्वचषकात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात त्यांना सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तानला 117 चेंडू आणि सात विकेट राखून सहज पराभव केले. या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नेटरनरेटमध्ये मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानचा रनरेट प्लसमधून मायनसमध्ये गेला आहे. दोन विजय आणि एका पराजयासह पाकिस्तान सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. पण रनरेट -0.137 असा झाला आहे.  


वर्ल्डकपमधून बाहेर जाणार पाकिस्तान ?


विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यामध्ये दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघाला नेदरलँड्स आणि श्रीलंका या दुबळ्या संघाचा पराभव करु शकला आहे. यजमान भारताकडून त्यांचा पराभव झाला आहे. दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा रनरेट घसरला आहे. विश्वचषकात सेमी फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवायचा असल्यास सात सामने जिंकावेच लागतील. सेमीफायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी 14 गुण मिळवावे लागतील. 


समीकारण काय ?


पाकिस्तान संघाने दोन विजयासह चार गुणांची कमाई केली आहे. पाकिस्तान संघाला आणखी चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तान संघाला आतापर्यंत फक्त कमकुवत संघाविरोधात विजय मिळवता आले आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार तगड्या संघाविरोधात पाकिस्तान संघाचे सामने शिल्लक आहेत. पाकिस्तान संघाचे सहा सामने शिल्लक आहेत, त्यापैकी चार सामने तगड्या संघाविरोधात आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेश या कमकुवत संघाविरोधातही पाकिस्तानला खेळायचे आहे. पण अफगाणिस्तानचा संघाची सध्याची स्थिती पाहता त्यांची विश्वचषकातील मोहीम लवकरच संपेल असा अंदाज आहे. 


कारण काय ? 


पाकिस्तान संघाचा कर्णधार लयीत नाही. मध्यक्रम तितकी चांगली कामगिरी करत असल्याचे दिसत नाही. वेगवान गोलंदाजी दुबळी दिसत आहे. फिरकी गोलंदाजी ही पाकिस्तानची कमकुवत बाजू दिसत आहे. नवाज आणि शादाब यांची फिरकी गोलंदाजी प्रभावहीन दिसत आहे. विकेट तर दूरच धावाही रोखण्यात त्यांना यश मिळत नाही. नसीम शाहच्या अनुपस्थितीत वेगवान मारा अतिशय कमकुवत दिसतोय.


गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर - 


पाकिस्तानचा पराभव करत शनिवारी भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतायी संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. पण भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे भारत टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला.