मुंबई : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता किस्सा घडतोच. असाच एक गाजलेला किस्सा म्हणजे वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यातील 'बाप-बेटा'चा प्रसंग. परंतु शोएब अख्तरने असा प्रसंग कधी घडलाच नसल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही गैरवर्तन करणाऱ्या हरभजन सिंहला मारण्यासाठी हॉटेलच्या रुममध्ये गेलो होतो, असंही त्याने सांगितलं.


हॅलो अॅपवरील लाईव्ह मुलाखतीदरम्यान रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने सेहवागने सांगितलेल्या 'बाप बाप होता है' या प्रसंगाविषयी भाष्य केलं. शोएब अख्तर म्हणाला की, "अशापद्धतीने कोणी बोललं असतं तर मी सहन केलं असतं असं वाटतं का? उलट 2011 च्या विश्वचषकादरम्यान मी सेहवागचा शर्ट पकडून मी त्याला गौतम गंभीरच्या समोर याविषयी विचारणा केली होती. तू असं काही टीव्हीवर बोलला होता का, असं मी त्याला विचारलं. तेव्हा सेहवागने याला नकार दिला होता. सेहवाग आता ही बाब फेटाळू शकतो. पण वाटल्यास गौतम गंभीरला विचारा, त्याच्यासमोर मी विचारलं होतं. मी म्हणालो, जर तू हे बोलला असशील आणि मी ऐकलं, तर तुला सोडणार नाही."


कोरोनाविरोधी लढाईत निधी जमवण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा : शोएब अख्तर


बाप बाप होता है, बेटा बेटा
एका कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने सेहवागला स्लेजिंग तसंच इतर किस्स्यांबाबत विचारलं होतं. त्यावर सेहवागने 2003 च्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शोएब अख्तरचा एक किस्सा सांगितला होता.


सेहवाग म्हणाला होता की, "मी बॅटिंग करत होतो आणि शोएब अख्तर बोलिंग करत होता. पण, शोएब प्रत्येक बॉल बाऊन्सर टाकत होता आणि प्रत्येकवेळी म्हणायचा, 'हुक मारके दिखा'! मी शोएबला तेव्हा उत्तर दिलं, नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला सांग, तो मारुन दाखवेल. त्यावेळी नॉन स्ट्राईकर एंडवर सचिन तेंडुलकर उभा होता आणि सचिनने पुढच्याच ओव्हरला शोएबच्या बाऊन्सरवर सिक्सर लगावला. तेव्हा मी शोएबला म्हणालो, बेटा बेटा होता है और बाप बाप होता है."


जेव्हा वीरु अख्तरला म्हणाला होता, बेटा बेटा होता है, और बाप बाप 


आता या प्रसंगावर शोएब अख्तरची बाजू पहिल्यांदाच समोर आली आहे. परंतु त्याने लाईव्ह मुलाखतीदरम्यान असा प्रसंग कधी घडलाच नसल्याचं सांगितलं. उलट नंतर सेहवागनेच घुमजाव केल्याचं शोएब अख्तरने म्हटलं.



हरभजनला मारणार होतो : शोएब अख्तर
इतकंच नाही तर हरभजन सिंहला मारणार होतो, असंही शोएब अख्तरने या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला की, "हरभजन सिंहला मारण्यासाठी मी त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये गेलो होतो. आमच्यासोबत खातोस, फिरतोस, संस्कृती सारखी आहे. पंजाबी आहेस, माझ्या धाकट्या भावासारखा आहेस आणि माझ्यासोबत गैरवर्तन? तुला हॉटेलमध्ये जाऊन मारणार, पण मारणार नक्की. त्याला माहित होतं की मी त्याला मारणार, सोडणार नाही. पण तो सापडलाच नाही. त्यानंतर माझा माझा राग शांत झाला. मग त्याने माझी माफी मागितली."