Pakistan Team: भारतात झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये पाकिस्तानी संघाची (Pakistan Team) कामगिरी काही खास नव्हती. पाकिस्ताननं केवळ चारच सामने जिंकले. वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. बाबर आझमनं तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं आणि त्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाची तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे टी-20 संघाची धुरा सोपवण्यात आली.


पाकिस्तानच्या सामन्यात जातीवाचक शब्दांचा वापर


आता कटू आठवणी विसरून पाकिस्तानी संघानं पुन्हा नव्या जोमानं सुरुवात केली आहे. पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी क्रिकेट संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. दौरा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळत आहे. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा वाद निर्माण झाला. हा वाद कोणत्या खेळाडूमुळे नाहीतर ब्रॉडकास्टर्स चुकीमुळे उद्भवला. पाकिस्तानी संघासाठी थेट स्कोअरवर 'पाकी' हा जातीवाचक शब्द वापरला, ज्यामुळे वाद निर्माण झाला. 


ब्रॉडकास्टर फॉक्स क्रिकेटनं लाईव्ह स्कोअरवर पाकिस्तान संघासाठी हा शब्द लिहिला होता. एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं त्याच्या ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) आपल्या चुकीबद्दल माफी देखील मागितली आणि त्यानंतर तात्काळ आपली चूक सुधारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पाकी' हा अपमानास्पद जातीवाचक शब्द आहे. जन्म किंवा वंशानुसार पाकिस्तानी किंवा दक्षिण आशियाई व्यक्तीचा संदर्भ देण्यासाठी याचा वापर केला जातो.


ऑस्ट्रेलियन पत्रकार डॅनी सईद यांनी केलेल्या ट्विटर पोस्टनं याकडे लक्ष वेधलं. याचबाबत आणखी एक पोस्ट करत त्यांनी लिहिलं की, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांची चूक मान्य केली आहे आणि झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी देखील मागितली आहे. सईद यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्टीकरण दिलंय की, "हे ग्राफिक्स डाटाचं स्वयंचलित फीड होतं, जे यापूर्वी पाकिस्तान संघासाठी वापरलं गेलं नव्हतं. पण जे घडलं, ते नक्कीच खेदजनक आहे आणि ही चूक लक्षात येताच, आम्ही तात्काळ त्यात सुधारणा केली आहे.  


पाकिस्तानी कर्णधारानं ठोकलं द्विशतक 


पंतप्रधान इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तानी संघानं पहिला डाव 9 विकेट्सवर 391 धावांवर घोषित केला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं पहिल्या डावात नाबाद 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात प्राईम मिनिस्टर इलेव्हननं दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तोपर्यंत दोन गडी गमावून 149 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी डावखुरा फलंदाज सॅम अय्युब आणि वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद यांना पहिल्यांदाच पाकिस्तानी कसोटी संघात स्थान मिळालं आहे. 21 वर्षीय अय्युबनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला पाकिस्तानी संघ 


शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, फहीम अशरफ, हसन अली, इमाम उल हक, खुर्रम शहजाद, मीर हमजा, एम. रिजवान, मोहम्मद वसीम, नोमान अली, सॅम अय्युब, सलमान आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहीन आफरीदी.