Legends League Cricket :  क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या दिग्गज क्रिकेटपटू सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत (Legends League Cricket) खेळत आहेत. या स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्समध्ये एक सामना पार पडला. या सामन्यात गुजरातकडून श्रीशांत (Sreesanth) गोलंदाजी करत होता. तर, इंडिया कॅपिटल्सकडून गौतम गंभीर (Gautam Gambhir) फलंदाजी करत होता. गौतम गंभीरने श्रीशांतच्या गोलंदाजीचा समाचार घेत चौकार-षटकार लगावले. त्यानंतर टीम इंडियाच्या विश्वविजेत्या संघातील सदस्यांमध्ये वादावादी झाली. 


श्रीशांतचे गंभीरवर आरोप... 


टीम इंडियासाठी खेळताना प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या दोन खेळाडूंमध्ये भरमैदानात वादावादी झाली. त्यांच्या या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ही व्हायरल झाला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी श्रीशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक लाईव्ह व्हिडीओ केला. यामध्ये त्याने सामन्यात झालेल्या वादाबाबत भाष्य केले. यावेळी श्रीशांतने गंभीरवर अतिशय गंभीर आरोप केले. त्याने म्हटले की, गंभीर फलंदाजी करत असताना वारंवार शिवीगाळ करत होता. त्याने अपशब्द वापरले आणि त्याला फिक्सर म्हणत त्याचा अपमान केला.


श्रीशांतने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "प्रत्येक चॅनलवर जाऊन पुन्हा पुन्हा सांगण्याऐवजी, मी थेट येऊन सर्व काही एकाच वेळी स्पष्ट करणे चांगले आहे. गौतम गंभीरकडे एक उत्कृष्ट आहे. एक पीआर टीम ज्यावर ते खूप पैसे खर्च करतात. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्याने माझी लढाई एकटाच लढू शकतो."






अपमानास्पद भाषा वापरली


श्रीशांत पुढे म्हणाला, "मला एवढेच सांगायचे आहे की, थेट टेलिव्हिजनवर, खेळपट्टीच्या मध्यभागी, तो मला फिक्सर...फिक्सर...फिक्सर... ( आणि काही अपशब्द वापरून) फिक्सर म्हणत राहिला. हसून त्याला सांगितले की तू काय बोलतो आहेस. मी कधीही चुकीचा शब्द किंवा असभ्य भाषा वापरली नाही. मी तिथून दूर गेलो आणि पंचांनीदेखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने पंचानांही असभ्य भाषा वापरण्याचा प्रयत्न केला.