ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जाणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष (PCB) मोहसिन रझा नक्वी यांनी स्पष्ट केली आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र बीसीसीआयने अजूनही याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पीसीबीने हायब्रिड मॉडेलचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिपोर्टमध्ये पीसीबी अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट केले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करेल, ज्यासाठी कोणतेही हायब्रीड मॉडेल लागू केले जाणार नाही. भारताला पाकिस्तानात आणणे हे आयसीसीचे काम आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नाही, असंही पीसीबीने म्हटलं आहे. दरम्यान बीसीसीआयने आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्यास सुचवले आहे.
टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार-
बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानसह यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?