Zimbabwe vs Pakistan 2nd ODI : पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. संघ तेथे तीन एकदिवसीय सामने खेळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या संदर्भात ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मात्र, पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पावसामुळे त्या सामन्याचा निकाल DLS पद्धतीने लावला असला तरी सामना पूर्ण झाला असता तरी झिम्बाब्वे संघ जिंकला असता. मात्र आता पाकिस्तानी संघाने दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. पाकिस्तानचा हा विजय सामान्य नसून मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे.
पाकिस्तानने केला झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने हा सामना 10 विकेटने जिंकला. याआधी 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये पाकिस्तानने एकदिवसीय सामना दहा गडी राखून जिंकला होता. तेव्हापासून आजपर्यंत एवढा मोठा विजय मिळवता आला नव्हता, पण आता रिझवानच्या नेतृत्वाखाली यांना ही कामगिरी करता आली. विशेष म्हणजे या विजयाचा समावेश केला तर पाकिस्तानी संघाने आतापर्यंत केवळ पाच एकदिवसीय सामने 10 विकेटने जिंकले आहेत.
पाकिस्तानचा वनडेमधला हा 10 विकेटने पाचवा विजय
1986 साली शारजाहमध्ये न्यूझीलंडचा पराभव करताना पाकिस्तानने पहिला एकदिवसीय सामना दहा विकेटने जिंकला होता. यानंतर त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. 2008 मध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा त्यांच्या घरच्या कराचीमध्ये 10 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर 2011 मध्ये या संघाने दोनदा हा पराक्रम केला. प्रथम संघाने मिरपूर येथे वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून पराभव केला आणि त्यानंतर हरारे येथे झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. 2011 नंतर आता 2024 मध्ये पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला आहे, त्यामुळे हा विजय आणखी खास झाला आहे.
सॅम अयुबने धडाकेबाज ठोकले शतक
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 10 गडी गमावून 145 धावा केल्या. संघाला 50 षटकांचा कोटाही खेळता आला नाही आणि केवळ 32.3 षटकांत ते ऑलआऊट झाले. एकाही फलंदाजाला पन्नाशीचा टप्पा ओलांडता आला नाही. यानंतरच पाकिस्तानने हा सामना सहज जिंकला. पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीने केवळ 18.2 षटकांत कोणतेही नुकसान न करता 148 धावा केल्या आणि सामना जिंकला. सॅम अयुबने केवळ 62 चेंडूत 113 धावा केल्या. तर अब्दुल्ला शफीकने 48 चेंडूत 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.