PAK vs BAN 1st Rawalpindi Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघांमधील सामन्याचा आज चौथा दिवस आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशचा संघ पाकिस्तानपेक्षा 122 धावांनी पिछाडीवर होता. रावळपिंडी येथे खेळला जाणारा हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या तिकिटाची किंमत केवळ 50 रुपये ठेवली आहे, जी भारतात 15 रुपयांच्या बरोबरीची आहे.
मात्र, एवढ्या कमी तिकीट दर असूनही प्रेक्षक अपेक्षेप्रमाणे स्टेडियममध्ये पोहोचले आले नाही, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
पीसीबीने तिकिटे केली मोफत....
सामन्यादरम्यान स्टेडियम रिकामे राहिल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसासाठी बोर्डाने तिकीट मोफत केले आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांची कमतरता लक्षात घेऊन पीसीबीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात तिकीट मोफत देण्याचे कारण वीकेंड देण्यात आले आहे.
पीसीबीने काय म्हटले?
पीसीबीने मोफत तिकिटांबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, शनिवार व रविवारच्या निमित्ताने विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत तिकीट जाहीर करण्यात येत आहे. जेणेकरून ते क्रिकेट स्टारला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ शकतील. ज्यांनी मागील 2 दिवसांसाठी आधीच तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना पैसे मिळतील.
पाकिस्तान भूषवणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी पाकिस्तान जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारत पाकिस्तानला जाणार की भारताचे सामने हायब्रीड पद्धतीने खेळवले जातील याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.