Nitish Kumar Reddy Story : टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार नितीश रेड्डीने मेलबर्न येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावून खळबळ उडवून दिली. नितीशने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. नितीश रेड्डी फलंदाजीला आले तेव्हा भारतीय संघ सामन्यात पिछाडीवर होता, मात्र युवा अष्टपैलू खेळाडूने शानदार खेळी करत सामना रोमांचक केला आहे.






जेव्हा नितीश रेड्डी पहिले कसोटी शतक ठोकले, तेव्हा त्याचे वडीलही स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. शतक झळकावल्यानंतर नितीश रेड्डीने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने अप्रतिम संयम दाखवत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 171 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि एक षटकार लगावला. 21 वर्षीय नितीश रेड्डीने चौकार मारत कसोटी क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे.






नितीशच्या करिअरसाठी सोडली नोकरी


नितीश कुमार रेड्डी याचा क्रिकेट प्रवास सोपा नव्हता. त्याच्या वडिलांनी त्यांच्या करिअरसाठी स्वत:ची नोकरी सोडली. पण नितीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला आहे, हे त्याच्या वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे. नितीश यांनी एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, त्याचे वडील हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो एक चांगला क्रिकेटर बनू शकतो.


नितीश रेड्डीचा बीसीसीआयने आधी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, 'मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. वडिलांनी माझ्यासाठी नोकरी सोडली, त्यांनी माझ्या प्रवासात खूप संघर्ष केला, आणि अनेक गोष्टींचा त्याग पण केला. एक दिवस मी त्यांना पैशांअभावी रडताना पाहिले आहे, त्यानंतर मी खूप मेहनत केली. आणि आज माझ्यामुळे माझे वडील आनंदी आहेत याचा मला खूप आनंद आहे. टीम इंडियाची पहिली जर्सी मी माझ्या वडिलांना दिली.






नितीश कुमार रेड्डी विराट कोहलीचा मोठा चाहता


26 मे 2003 रोजी जन्मलेले नितीश कुमार रेड्डी हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सुरुवातीपासूनच मोठा चाहता आहे. विजय मर्चंट ट्रॉफी 2017-18 च्या हंगामात नितीशने आश्चर्यकारक कामगिरी केली होती. खरंतर, नितीशने 176.41 च्या सरासरीने 1,237 धावा केल्या होत्या, जे या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावा आहेत. 2018 च्या वार्षिक पुरस्कार समारंभात बीसीसीआयद्वारे 16 वर्षाखालील श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड झाली होती, तेव्हा नितीश विराटला भेटला.


पदार्पणाच्या टी-20I मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी


देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर नितीश कुमार रेड्डीची भारतीय संघात निवड करण्यात आली. नितीशने या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या त्या सामन्यात नितीश 16 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर नितीशने आपल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डी केवळ बॅटनेच नाहीत, तर चेंडूनेही कहर केला. त्याने बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या टी-20 मालिकेतही तीन विकेट घेतल्या होत्या. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेत नितीशने आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत.


हे ही वाचा -


Nitish Kumar Reddy First Century : लढला, भिडला, झुकेगा नहीं साला! चौकार मारत नितीश कुमार रेड्डीने ठोकले कारकिर्दीतील पहिले शतक, वडिलांच्या डोळ्यात पाणी