Cricket Song : भारतीयांसाठी क्रिकेट (Cricket) हा फक्त खेळ नसून धर्म आहे. क्रिकेट खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रिकेटवेड्या भारतात लहाणग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच क्रिकेट पाहतात. त्यामुळे क्रिकेटर्सना देव ही केलं जातं, तर खराब खेळल्यावर त्याला प्रचंड ट्रोलही केलं जातं. सध्या तर टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) सुरु असून यामध्ये आपण दर सामन्यानंतर सोशल मीडियावर नवनवीन मीम्स आणि पोस्ट्स पाहतोय. पण या मीम्स आणि सोशल मीडियाच्या येण्याआधी एका गाण्यातून फलंदाजाच्या नजरेतून अवघ्या जीवनाचा सार सांगितला आहे. विशेष म्हणजे हे गाणं मराठी असून स्वत: महान क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनी हे गाणं गायलं आहे. 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा!'असं गाण्याचं नाव जीवनाच्या क्रीडांगणी या अल्बमधील हे एक गाणं आहे. शांताराम नांदगावकर यांनी गाण्याचे बोल लिहिले असून गौतम गिरीष यांनी संगीत दिलं आहे. 1979 मध्ये हे गाणं आलं असून तर नेमकं गाणं कसं आहे आणि यातून कसा जीवनाचा सार सांगितला आहे, ते पाहूया...


तर हे गाणं एक फलंदाजांच्या दृष्टीकोनातून लिहिलं असून फलंदाज आणि जीवन जगणारा व्यक्ती यांना कशा अडचणी येतात किंवा नेमकं जीवन कसं असतं? हे सांगितलंय.त्यात हे जीवन म्हणजे मैदान आहे आणि आपण जीवन जगताना म्हणजेच फलंदाजी करताना संकट ही गोलंदाजी करत असतात आणि अनेकजण आपला झेल घेऊन आपल्याला बाद करण्यासाठी सज्ज असतात. आपल्या मागेही काहीजण असतात जे यष्टीरक्षक बनून आपल्याला बाद करु इच्छित असतात.त्यामुळे जो चतुर असतो तोच इथे टिकतो.तसंच क्रिकेट मैदानात फलंदाजाचा जयघोष होतो, तसा इथेही झाला तरी हे गाणं विसरता कामा नये आणि हे सगळं सांगत एक महत्त्वाचा आणि गाण्याचा मुखडाच आहे, जो हुकला तो संपला... त्यानुसार कोणतीही संधी हुकवता कामा नये असा मोलाचा संदेश या गाण्यात देण्यात आला आहे.


वाचा संपूर्ण गाणं-   


अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी
डाव तुझा येतांच तू जमविशी आपुली खेळी


काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी
भवताली तव झेल घ्यावया जोतो फासे टाकी


मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
ह्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव


चतुर आणि सावध जो जो,तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !


तू ऐकत असता जयघोषाचे नारे
या कालगतीचे नकोस विसरू वारे


फटकार अचूक तू चेंडू हया काळाचा
आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा


निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !