IND Vs NZ, Innings Highlights : मोहम्मद शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 273 धावांवर रोखले. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने 130 तर रचित रवींद्र याने 75 धावांची खेळी केली. शामीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा डाव 273 धावांत संपुष्टात आला. भारताला विजयासाठी 274 धावांचे आव्हान मिळाले आहे. अखेरच्या दहा षटकात भारताने जबरदस्त कमबॅक केले. 10 षटकात भारताने फक्त 54 धावा खर्च करत सहा फलंदाजांना तंबूत धाडले. 


न्यूझीलंडचे सलामी फलंदाज अपयशी, कर्णधारही फेल -


भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातही अप्रतिम गोलंदाजी केली. 19 धावांवर दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले. डेवेन कॉनवे याला मोहम्मद सिराजने शून्यावर तंबूत धाडले. त्याने नऊ चेंडू खर्च केले. दुसरा सलामी फलंदाज विल यंग याला 19 धावांवर मोहम्मद शामीने तंबूचा रस्ता दाखवला. विल यंग याने 27 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावांचे योगदान दिले. दोन विकेट झटपट गेल्यानंतर रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला. कर्णधार टॉप लेथम याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने सात चेंडूत फक्त पाच धावा केल्या. लेथमला कुलदीप यादवने तंबूचा रस्ता दाखवला. 


तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी - 


जसप्रती बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी या वेगवान त्रिकुटापुढे न्यूझीलंडचे फलंदाज शांत होते. फण फिरकी गोलंदाजी सुरु झाल्यानंतर त्यांनी आक्रमक रुप धारण केले. दोघांनीही सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, त्यानंतर धावांची गती वाढवली. चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावसंख्या घेत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. डॅरेल मिचेल आणि रचित रविंद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी 152 चेंडूमध्ये 159 धावांची भागीदारी केली. 


रचित रविंद्रचे अर्धशतक -


युवा रचित रविंद्र याने न्यूझीलंडसाठी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. 9 धावांवर कॉनवे तंबूत परतला, त्यानंतर मैदानावर रचितने राज्य केले. भारतीय खेळाडूंनी रचित रविंद्रला जीवनदानही दिले. सोपे झेल सोडले, त्याचा फायदा रवींद्रे घेतला. रचित रवींद्र याने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये रवींद्रने एक षटकार आणि सात चौकार लगावले. रचितने कठीम परिस्थितीमध्ये डॅरेल मिचेलसोबत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. 


डॅरेल मिचेलची शतकी खेळी - 


डॅरेल मिचेल याने रचित रवींद्रच्या साथीने न्यूझीलंडचा डाव सावरला. पण रवींद्र बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. पण दुसऱ्या बाजूला डॅरेल मिचेल याने धावांचा पाऊस पाडला.डॅरेल मिचेल याने 127 चेंडूत 130 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये मिचेल याने 5 षटकार आणि 9 चौकार ठोकले. 


रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलच्या खेळीने चेहरे पडले 


रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी केलेल्या 159 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळाले. 25 ते 35 षटकांच्या षटकांच्या खेळीत टीम इंडियाच्या फिल्डींगमध्ये चुका झाल्याच, पण रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलने केलेल्या फटकेबाजीने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. त्यामुळे मैदानासह प्रेक्षकांमध्येही सन्नाटा पसरला. विराट कोहली, शुभमन गिल, रोहितसह सर्वांचेच चेहरे पडले होते. काही काळ विराट आणि रोहितमध्ये फिल्डिंगवरून किंचित पारा चढल्याचेही दिसून आले.


न्यूझीलंडचे फलंदाज अखेरीस ढेपाळले -


हाणामारीच्या षटकात ग्लेन फिलिप्स याने 26 चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले. कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फिलिप्स रोहित शर्माकडे झेल देऊन माघारी परतला.


मार्क चैम्पमन याला फटकेबाजी करता आली नाही. बुमराहच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 8 चेंडूमध्ये सहा धावा केल्या.


मिचेल सँटनर यालाही अखेरीस धावा काढण्यात अपयश आले. मोहम्मद शामीच्या अचूक यॉर्करवर सँटरन त्रिफाळाचीत बाद झाला. सँटनरला फक्त एक धाव काढता आली.


मॅट हॅनरी पहिल्याच चेंडूवर त्रिफाळाचीत बाद झाला. हॅनरीला मोहम्मद शामीने शून्यावर बाद केले. 


लॉकी फर्गुसन एका धावेवर धावबाद झाला. 


भारताची गोलंदाजी कशी राहिली - 


मोहम्मद शामी याने जबरदस्त कमबॅक केले. यंदाच्या विश्वचषकात पहिलाच सामना खेळणाऱ्या शामीने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. शामीने दहा षटकात 54 धावा खर्च केल्या. शामीच्या षटकात एक षटकार आणि सहा चौकार गेले.


जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडविरोधात कंजूष गोलंदाजी केली. बुमराहने 10 षटकात 45 धावा कर्च केल्या. यामध्ये एक षटक निर्धाव टाकले. शामीने एक विकेटही घेतली. बुमराहच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या एकही षटकार मारता आला नाही.


कुलदीप यादव आज महागडा ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कुलदीपच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. कुलदीपने 10 षटकात 73 धावा खर्च केल्या. त्याच्या षटकात तीन चौकर आणि 4 षटकार मारले गेले. पहिल्या चाप षटकात कुलदीपला प्रति षटक 10 ने धावा चोपल्या. पण अखेरीस कुलदीपने जोरदार कमबॅक केले. कुलदीप यादवने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.


मोहम्मद सिराजने धरमशालाच्या मैदानावर भेदक मारा केली. सिराजने 10 षटकांमध्ये फक्त 45 धावा खर्च केल्या. यामध्ये एक षटकाही निर्धाव फेकले. सिराजने एक विकेटही घेतली. सिराजच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार गेला.


रवींद्र जाडेजाने 10 षटकांचा कोटा पूर्ण केला. रवींद्र जाडेजाला एकही विकेट मिळाली नाही. रवींद्र जाडेजाने 10 षटकात 48 धावा खर्च केल्या. जाडेजाच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार गेले.


 


 


आणखी वाचा :


भारताच्या फिल्डिंगला झालं तरी काय, तीन झेल सोडत आपलीच अडचण वाढली, विराटच्या चेहऱ्याचा रंग उडाला, चाहतेही संतापले 


बुमराहची पॉवरप्लेमध्ये पॉवर...  प्रत्येक संघाला भरतेय धडकी, यॉर्कर किंगची आकडेवारी पाहून घामटा फुटेल! 


विश्वचषकात भन्नाट रेकॉर्ड, तरीही शामी संघाबाहेर, संधी मिळताच पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड