Mohammed Shami In World Cup : हार्दिक पांड्या बांगलादेशविरोधात दुखापतग्रस्त झाला अन् टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोहम्मद शामीला स्थान मिळाले. भारतात होत असलेल्या विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यात शामीला संघात स्थान मिळाले नव्हते. पण संधी मिळताच शामीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आपली प्रतिभा दाखवून दिली. शामी टीम इंडियाचे नववे षटक घेऊन आला होता, पहिल्याच चेंडूवर त्याने न्यूझीलंडच्या विल यंग याला तंबूचा रस्ता दाखवला. शामीने विकेट घेताच धरमशालाच्या मैदानात जल्लोष सुरु झाला. शामीची विश्वचषकातील ही 32 वी विकेट ठरली. अवघ्या 12 सामन्यात शामीने विश्वचषकात 32 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय.
टीम इंडिया विश्वचषकात भन्नाट फॉर्मात आहे. सुरुवातीच्या चार सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघाना पराभूत केले. पण या चारही सामन्यात शामीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. प्रतिभा असतानाही मोहम्मद शामी प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवू शकत नव्हता. पण बांगलादेशविरोधात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे टीम इंडियाचा बॅलेन्स बिघडला. त्यामुळे शामीसाठी प्लेईंग 11 चा दरवाजा उघडला गेला. त्यानंतर शामीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आपली प्रतिभा दाखवून दिली.
धरमशालाच्या मैदानावर कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियात दोन बदल करण्यात आले. शार्दूल ठाकूर याला संघाबाहेर बसवण्यात आले. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला स्थान मिळाले तर शार्दूलच्या जागी मोहम्मद शामी याला संधी देण्यात आली. मोहम्मद शामी याने या संधीचे सोनं केलेय. पहिल्याच चेंडूवर त्याने भारताला यश मिळवून दिले.
वर्ल्डकपमधील शामीची कामगिरी -
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये मोहम्मद शामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शामीने विश्वचषकातील 12 वा सामना खेळला आहे. यामध्ये त्याने 32 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने एक वेळा पाच आणि तीन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा असेल. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. शामीला पहिल्यांदाच प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात शामीने भेदक मारा केला होता. यंदाच्या विश्वचषकात शामीला आणखी संधी मिळणार का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.