IND vs NZ Semi-Final Innings Highlights:  विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकाच्या बळावर भारताने उपांत्य सामन्यात 397 धावांचा डोंगर उभारलाय. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 105 धावांचा पाऊस पाडला. त्याशिवाय शुभमन गिल यानेही अर्धशतक ठोकले. अखेरच्या दहा षटकात भारताने 110 धावांचा पाऊस पाडला. विराट, राहुल आणि श्रेयस यांनी न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली. न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचा  पाठलाग करायचाय. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत 350 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग झालेला नाही.



विराट कोहलीचे 50 वे शतक -
रोहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराट कोहलीने भारातची धावसंख्या वाढवली. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत आधी मोठी भागिदारी केली. गिल क्रॅम्प आल्यामुळे मैदानाबाहेर गेला. पण त्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत 93 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अय्यरसोबत त्याने 128 चेंडूत झटपट 163 धावांची भागिदारी केली. विराट कोहली आणि अय्यर यांनी भारताची धावगती वाढण्याचे काम केले. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची जिगरबाज खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला. 


अय्यरचे विश्वचषकातील दुसरे शतक - 


श्रेयस अय्यरने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. अय्यरने पहिल्या चेंडूपासूनच हल्लाबोल केला. अय्यरने विराट कोहलीसोबत 163 धावांची शानदार भागिदारी केली.  त्यानंतर अखेरीस केएल राहुलसोबत वेगाने धावसंख्या वाढवली. अय्यर आणि केएल राहुल यांच्यामध्ये 29 चेंडूमध्ये 54 धावांची महत्वाची भागिदारी झाली. अय्यरने अवघ्या 70 चेंडूमध्ये 105 धावांची विस्फोटक खेळी केली. यामध्ये तब्बल आठ षटकारांचा समावेश होता. अय्यरने चार चौकारही लगावले. 



रोहितची वादळी सुरुवात - 


नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने नेहमीप्रमाणेच चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने शुभमन गिलच्या साथीने भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्मा 47 धावा काढून बाद झाला. पण त्याने त्याचं काम चोख बजावले होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 8.2 षटकात 71 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 29 चेंडूमध्ये चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावांचं योगदान दिले. 


शुभमन गिलचा तडाखा - 


सलामी फलंदाज शुभमन गिल यानेही पुन्हा एकदा वादळी फलंदाजी केली. रोहितची फटकेबाजी सुरु असताना दुसऱ्या बाजूला शातंते खेळणाऱ्या गिलने अप्रतिम फटकेबाजी केली. शुभमन गिल याने 80 धावांचे योगदान दिले. क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिल याला मैदान सोडावे लागले होते. शुभमन गिल याने विराट कोहलीसोबत 93 धावांची भागिदारी केली. शुभमन गिलने 66 चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या.  अखेरच्या षटकात शुभमन गिल पुन्हा मैदानात आला होता. 



केएल राहुलचा फिनिशिंग टच 


विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलने श्रेयस अय्यरला चांगली साथ दिली. अय्यरसोबत त्याने अर्धशतकी भागिदारी केली.  राहुलने अखेरीस 20 चेंडूमध्ये 39 धावा झोडपल्या. त्याने दोन षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला. 


सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात फक्त एक धाव काढून सूर्यकुमार यादव बाद झाला.


न्यूझीलंडची गोलंदाजी फोडली - 


रोहित, गिल, विराट आणि अय्यरने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडली. ट्रेंट बोल्ट याला 10 षटकात 86 धावा चोपल्या. त्याला फक्त एक विकेट मिळाली.  लॉकी फर्गुसन याला 8 षटकात 65 धावा निघाल्या. मिचेल सँटनर याला 10 षटकात 51 धावा दिल्या. ग्लेन फिलिप्सला पाच षटकात 33 धावा निघाल्या. रचिन रविंद्रला सात षटकात 60 धावा चोपल्या. टीम साऊदी याने आपल्या दहा षटकात तब्बल 100 धावा खर्च केल्या.  त्याला तीन विकेट मिळाल्या, पण तो खूपच महागडा ठरला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीचा अपवाद वगळता न्यूझीलंडची गोलंदाजी फिकी दिसली.