New Zealand Women Vs India Women: क्वीन्सटाऊनच्या (Queenstown) जॉन डेव्हिस ओव्हल (John Davies Oval) मैदानात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 3 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आलेल्या 5 सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं 3-0 विजय मिळवून मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील अखरेचे दोन सामने केवळ औपचारिकता म्हणून खेळले जातील. 


भारताचं मालिका टिकवण्याचं आव्हान संपुष्टात
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं 49.3 षटकात 10 विकेटस् गमावून 279 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघानं 49.1 षटकात 7 विकेट्स गमावून भारतानं दिलेलं 280 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. पाच सामन्याच्या मालिकेत भारतानं सुरुवातीचे 2 सामने गमावले होते. यामुळं तिसरा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं होतं. परंतु, न्यूझीलंडच्या संघानं तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताचं मालिका टिकवण्याचं आव्हान संपुष्टात आणलं.


एस मेघना, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माची अर्धशतकीय खेळी व्यर्थ
या सामन्यात एस मेघना, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 280 धावांचे मजबूत लक्ष्य ठेवलं. मेघना आणि शेफाली यांनी पहिल्या विकेट्ससाठी 100 धावांची भागीदारी केली. मेघनानं 41 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 61 धावा केल्या, जे तिच्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. तर, शेफालीनं 57 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. शेफालीचं हे एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय, दीप्तीनंही नाबाद 61 धावांची खेळी केली. ज्यात 7 चौकारांचा समावेश आहे. कर्णधार मिताली राजनं 23 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हॅना रोवे आणि रोझमेरी मायर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, सोफी डेव्हाईन अमेलिया केर, फ्रान्सिस मॅके आणि एमी सॅटरथवेट यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवता आलीय.


भारताचा 3 विकेट्सनं पराभव
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं 14 धावांतच त्यांचे दोन विकेट्स गमावले. मात्र, यानंतर एमी सॅटरथव्हेट (59) आणि एमिला केर (67) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 चेंडूत 103 धावांची शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. केरनं 80 चेंडूंत 8 चौकार मारले. तर, सॅटरथव्हेटनं 76 चेंडूंत 6 चौकार मारले. त्याच्याशिवाय मॅडी ग्रीननं 24 आणि लॉरेन डाऊननं नाबाद 64 धावा केल्या. डाऊननं 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर, केटी मार्टिननं 37 चेंडूत 35 धावा केल्या. अखेरच्या षटकात न्यूझीलंडच्या संघानं 3 राखून भारतावर विजय मिळवला.भारताकडून गोस्वामीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर, रेणुका सिंह, एकता बिष्ट, दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळालीय. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha