Covid Vaccine : कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस (Covid Vaccine) घेणार नाही, असे सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने स्पष्ट केले आहे. या निर्णायाची कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचेही जोकोविचने सांगितलेय. लस न घेतल्यामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याला विमानतळावर अटकही करण्यात आली होती. त्यावेळी हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. पण लस न घेण्यावर जोकोविच ठाम राहिला आहे. आता कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India -SII) सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी जोकोविचला लस घेण्याची विनंती केली आहे. अदर पूनावाला यांनी ट्विट करत जोकोविचला लस घेण्याची विनंती केली आहे. अव्वल टेनिस स्टार नोवाक जोकोविच (Novak Djokovic ) याच्या कोरोना लस (Covid Vaccine) न घेण्याच्या विचाराचा सन्मान करतो. पण मला आशा आहे की, जोकोविच आपला विचार नक्कीच बदलेल, असे अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  


अदर पूनावाला यांनी जोकोविचला टॅग करत म्हटले की,’कोरोना लस न घेण्याच्या तुमच्या व्यक्तीगत विचाराचा सन्मान करतो. तुम्हाला खेळताना बघायला आवडते, पण मी आशा करतो की लसीकरणाबाबत तुम्ही नक्कीच विचार बदलाल. दरम्यान, आता आपल्यापैकी बाकीच्यांना ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी मिळू शकते.’ अदर पूनावाला यांनी या ट्विटसोबत नोवाक जोकोविच याचा टेनिस खेळतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. 






कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटमुळे  जगभरातच घबराट पसरलेली आहे. अशा वातावरणातही सर्व महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केले जात आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला बायो बबल, कोरोना नियम, कोरोना चाचण्या, कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे नियम आखण्यात आले आहे. प्रत्येक खेळाडूंना या नियमांचे पालन करावे लागते.  अनुभवी, अननुभवी, दिग्गज अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या खेळाडूला कोरोना नियमातून सूट – सवलत दिली जात नाही. सर्वांना नियम सारखेच असतात. पण स्टार टेनिसपटू नोवाक जोकाविच याने कोणत्याही परिस्थिती कोरोना प्रतिंबधक लस घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी कोणताही किंमत मोजायला तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत नोवाक म्हणाला होता की, ‘भविष्यात होणाऱ्या कोणत्याही टेनिस स्पर्धेसाठी सहभागी होऊ दिले नाही, तरीही कोरोना लस घेणार नाही.’  मी लसीकरणाच्या विरोधात नाही. पण लस घेण्याचा अथवा न घेण्याचा निर्णय व्यक्तीगत असायला हवा, तो लादला जाऊ नये, असेही नोवाक जोकाविच म्हणाला होता.