NZ vs SL, Test : श्रीलंका संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरील (Sri Lanka Tour of New Zealand) कसोटी मालिकेत किवी संघाने 2-0 अशा दमदार फरकाने विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवल्यावर आता दुसरा सामना न्यूझीलंडनं एक डाव 58 धावांनी जिंकत मालिकाही 2-0 ने जिंकली आहे. दुसऱ्य सामन्यात आधी फलंदाजी करत न्यूझीलंडनं 580 धावांचा मोठा डोंगर उभारला. केन आणि हेन्री यांनी दमदार द्वीशतकं ठोकली. त्यानंतर 164 धावांवर श्रीलंकेला सर्वबाद केल्यावर त्यांना फॉलोऑन मिळाला. मग दुसऱ्या डावातही श्रीलंकेचा संघ 358 धावाच करु शकल्याने न्यूझीलंड एक डाव आणि 58 धावांनी सामना जिंकण्यात यशस्वी झाला. 


वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना 215 धावा केल्या. त्याचवेळी माजी कर्णधाराच्या पाठोपाठ हेन्री निकोल्सनेही 200 धावांची नाबाद खेळी केली. या दोघांशिवाय डेव्हॉन कॉनवे 78 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे न्यूझीलंडने 4 बाद 580 धावा करून पहिला डाव घोषित केला. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या आणि धनंजय डिसिल्वाने 1-1 विकेट घेतली. त्यानंतक न्यूझीलंडच्या पहिल्या डावाविरुद्ध फलंदाजीला उतरल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने शरणागती पत्करली. पाहुण्या संघाला पहिल्या डावात केवळ 164 धावा करता आल्या. यानंतर किवींनी श्रीलंकेला फॉलोऑन करण्यास सांगितले. पाहुण्या संघाने फॉलोऑन खेळायला सुरुवात केल्यावर काहीतरी चमत्कार घडेल असे वाटत होते. श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी दुसऱ्या डावात चांगली खेळी केली. मात्र न्यूझीलंडच्या तगड्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज मोठे डाव खेळण्यात अपयशी ठरले. पाहुण्यांच्या दुसऱ्या डावावर नजर टाकली तर धनंजय डिसिल्वा 98, दिनेश चंडिमल 62, दिमुथ करुणारत्ने 51 आणि कुसल मेंडिसने 50 धावा केल्या. मात्र हे सर्व डाव संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 358 धावा करत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साऊथी आणि ब्लेअर टिकनर यांनी 3-3 बळी घेतले. तर मायकल ब्रेसवेल 2 खेळाडूंना बाद करण्यात यशस्वी ठरला. तर मॅट हेन्री आणि डग ब्रेसवेलने 1-1 विकेट घेतली. सामन्यात 200 धावा करणाऱ्या हेन्री निकोल्सला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्याचबरोबर संपूर्ण मालिकेत शानदार फलंदाजी करणाऱ्या केन विल्यमसनला प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.


सलामीच्या कसोटी न्यूझीलंडचा रोमहर्षक विजय


न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या (Team Sri Lanka) संघाने पहिले दोन दिवस वर्चस्व गाजवले. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाचा वरचष्मा होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत झाली. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य दिले होते, जे न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर 8 विकेट्स गमावून पूर्ण केले.


भारताला झाला मोठा फायदा


पहिल्या सामन्याच्या अखेरच्या डावात न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर किवी संघाने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे या विजयाचा थेट फायदा भारतीय संघाला झाला असून भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंकेचा संघ पराभूत झाल्यामुळे WTC फायनलच्या गुणतालिकेत खालच्या स्थानावर गेल्यामुळे भारत फायनलसाठी पात्र ठरला आहे.


हे देखील वाचा-