IND vs AUS, 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर एकतर्फी 10 गडी राखून विजय मिळवला. विशाखापट्टणम येथे खेळल्या मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा डाव अवघ्या 117 धावांवर आटोपला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) महत्त्वाच्या 5 विकेट्स घेतल्या. ज्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने अवघ्या 11 षटकांत हे लक्ष्य गाठून संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान या विजयात मिचेल स्टार्कने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 


काय म्हणाला स्टार्क?


सामन्यानंतर बोलताना स्टार्क म्हणाला, “माझा प्लॅन गेल्या 13 वर्षांपासून बदललेला नाही. बोलिंग करा ती देखील थेट स्टम्पवर करा, सर्व प्रयत्न करा आणि बॉलला स्विंग कर. पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न करणं ही माझी बर्‍याच काळापासूनची भूमिका आहे. फलंदाजाला बाद करण्याच्या सर्व पद्धती मी आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये हा नक्कीच नवीन गेम प्लॅन नाही. जेव्हा समोर पॉवरहाऊस बॅटिंग युनिट असतं भारताप्रमाणे तेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेऊ शकत असाल तरच सामन्यावर तुम्हील नियंत्रण ठेवू शकता."


भारतीय संघाचे चार फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत


या सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर ती अत्यंत खराब होती, ज्यामध्ये संघाचे 4 खेळाडू खातेही उघडू शकले नाहीत, याशिवाय केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. भारतीय संघासाठी विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. कांगारू संघाच्या गोलंदाजीत मिचेल स्टार्कने 8 षटकांत 53 धावा देत अर्धा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम केले. याशिवाय सीन अॅबॉटने 3 तर नॅथन एलिसने 2 बळी घेतले. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.


हेड-मार्श जोडीची कमाल


118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच आक्रमकपणे धावा काढण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे अशक्य वाटू लागले. ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली, तर मिचेल मार्शच्या बॅटने 36 चेंडूत 66 धावांची खेळी केली. दोघांनी अवघ्या 9 षटकांत संघाची धावसंख्या 100 धावांवर नेली. ज्यामुळे अवघ्या 11 षटकांत हे लक्ष्य गाठून संघाला विजय मिळवून दिला. 


हे देखील वाचा-