Bangladesh Won Test Match against New Zealand : कसोटी क्रिकेटमधील विश्वविजेत्या न्यूझीलंडला बांगलादेशने धक्का दिला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडवर पहिल्या कसोटीत आठ विकेट्सने मात केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले अवघ्या 40 धावांचे आव्हान बांगलादेशने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
बांगलादेशने न्यूझीलंडच्या भूमीवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवता आला नव्हता. अखेर 32 सामन्यानंतर पराभवाची मालिका खंडीत करण्यास बांगलादेशला यश मिळाले.
बांगलादेशने पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडला दुसऱ्या डावात अवघ्या 169 धावांमध्ये गुंडाळले. त्यानंतर विजयासाठी असलेले 40 धावांचे आव्हान दोन गडी गमावून पूर्ण करत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.
बांगलादेशचा गोलंदाज इबादत हुसैन याने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला खिंडार पाडले. हुसैनने 46 धावा देत न्यूझीलंडचे सहा गडी तंबूत माघारी धाडले. कसोटी क्रिकेटमधील हुसैनची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. न्यूझीलंड दौऱ्याआधी त्याने 10 कसोटी सामन्यात 81.54 च्या सरासरीने 11 गडी बाद केले होते. हुसैनला तस्कीन अहमद आणि मेहदी हसन मिराज चांगली साथ दिली. या दोघांनी तीन आणि एक बळी घेतला.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. न्यूझीलंडने पाच गडी गमावत 147 धावा केल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 5 फलंदाज अवघ्या 22 धावांमध्ये तंबूत परतले.
न्यूझीलंडने पहिल्या डावात 328 धावा केल्या होत्या. तर बांगलादेशने पहिल्या डावात 458 धावा उभारत न्यूझीलंडवर 130 धावांची आघाडी घेतली होती.
कसोटी अजिंक्यपद 2021-23 गुणतालिकेत मोठा बदल
या विजयासह बांगलादेशला कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत महत्त्वाचे 12 गुण मिळाले आहेत. गुणतालिकेत आता बांगलादेश पाचव्या स्थानी आहे. तर, भारत चौथ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया असून दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे.