T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (New Zealand vs Australia) यांच्यातील सामन्यानं टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव करत न्यूझीलंडनं 2021 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पराभवाचा वचपा काढला.  सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडनं डेवॉन कॉन्वे (नाबाद 92) आणि फिन ऍलन (42) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर टीम साऊथी आणि मिचेल सँटनेरच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघानं गुडघे टेकले. अवघ्या 111 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं इतिहास रचला. तब्बल 11 वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियात पहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलाय. 


तब्बल 11 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात पहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकला
दरम्यान, 2011 नंतर न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियात एकही सामना जिंकता आला नव्हता. परंतु, आजच्या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारत न्यूझीलंडनं तब्बल 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. न्यूझीलंडनं 2009 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला सामना जिंकला होता. 


केन विल्यमसनच्या नावावर खास विक्रमाची नोंद
न्यूझीलंडनं आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 20 सामन्यांत केवळ पाच वेळा विजय मिळवला आहे. दोनदा अशी कामगिरी करणारा केन विल्यमसन हा एकमेव किवी कर्णधार आहे.


घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचं दुसऱ्यांदा खराब प्रदर्शन
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दडपणाखाली ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 111 धावांत आटोपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना 20 धावांचा टप्पा गाठता आला. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 28 धावा केल्या. तर, पॅट कमिन्सनं 18 चेंडूत 21 धावा केल्या. घरच्या मैदानावर टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध 2010 मध्ये मेलबर्न येथे खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 127 धावांवर ऑलआऊट झाला होता.


हे देखील वाचा-