मुंबई : भारत (India) आणि अफगाणिस्तान (Afganistan) यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला होणार आहे. यापूर्वी शनिवारी अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला होता. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. खरंतर या मालिकेतून दुखापतीमुळे हार्दीक पांड्या (Hardik Pandya) बाहेर पडला होता. पण आता दुखापतीमुळे सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील या मालिकेच्या बाहेर पडला असल्याची माहिती समोर येतेय.
सूर्यकुमार आणि पांड्या अफगाणिस्तान मालिकेत खेळू शकणार नाही
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत न खेळणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पंरतु असं म्हटलं जात होतं की, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तान मालिकेतून पुनरागमन करू शकतात. पण आता ते पुनरागमन करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्याचवेळी हार्दिक पंड्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध दुखापतीचा बळी ठरला.
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या मैदानात कधी परतणार?
आता सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या मैदानात परत कधी येणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही दिग्गज आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होतील. म्हणजेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त भारतीय चाहत्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे, कारण यानंतर T20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले जाणार आहे. यंदाचा टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे.
मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. यानंतर 14 जानेवारीला दोन्ही संघ इंदूरमध्ये आमनेसामने येतील. त्यानंतर 17 जानेवारीला मालिकेतील तिसरा म्हणजेच शेवटचा सामना खेळवला जाईल. हा सामना बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. तसेच या मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.