Mumbai vs Madhya Pradesh Final बंगळुरु: मुंबईनं श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 वर नाव कोरलं आहे. मध्य प्रदेशला अंतिम फेरीच्या लढतीत मुंबईनं 5 विकेटनं पराभूत केलं. मध्य प्रदेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकडून अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेडगे यांनी दमदार फलंदाजी केली. यामुळं मुंबईनं 5 विकेट राखून विजय मिळवला.  मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असल्यानं त्यांची कामगिरी लक्षणीय राहिली.


मध्य प्रदेशनं दिलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघे सलामीला आले. पृथ्वी शॉ आज चांगली कामगिरी करु शकला नाही तो 10 धावा करुन बाद झाला. अजिंक्य रहाणेनं 37 धावांची खेळी केली. त्यानं 30 बॉलमध्ये 37 धावा करताना चार चौकार मारले. कॅप्टन श्रेयस अय्यरनं 16 धावा केल्या. त्यानं 2 चौकार आणि 1 षटकार मारला. शिवम दुबे 9 धावा करुन बाद झाला.  


सूर्यकुमार यादवची दमदार खेळी


सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानं 35 धावांचा सामना करताना 48 धावा केल्या. यामध्ये सूर्यकुमार यादवनं 4 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र, त्याला अर्धशतक करता आलं नाही. सूर्यांश शेडगेनं त्यानंतर 3 चौकार आणि 3 षटकार मारत 35 धावा केल्या. यामुळं मुंबईच्या संघाला विजय मिळवणं सोपं झालं.


मध्य प्रदेशचा डाव रजत पाटीदारनं सावरला


मध्य प्रदेशनं पहिल्यांदा फलंदाजी केली. 20 ओव्हरमध्ये मध्य प्रदेशनं 8 विकेटवर 174 धावा केल्या. रजत पाटीदारनं आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला. त्यानं  40 बॉलमध्ये 81 धावा केल्या.  पाटीदरानं या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले. मध्य प्रदेशकडून सुभ्रांशु सेनापतिनं  23 धावांची खेळी केली. त्यानं 17 बॉलमध्ये 2 षटकार मारले. व्यंकटेश अय्यर  17 धावा करुन बाद झाला, त्यानं एक चौकार आणि एक षटकार मारला. हरप्रीत सिंहनं 15 धावा केल्या. 


अंतिम फेरीत शार्दुल ठाकूरनं 2 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरनं  4 ओव्हरमध्ये 41 धावा देत 2 विकेट घेतल्या. रॉयस्टन डायसनं 3 ओव्हरमध्ये 32 धावा देत 2 विकेट घेतल्या. शिवम दुबे, श्रेयांश शेडगे आणि अथर्वला प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.


इतर बातम्या :



Ind vs Aus 3rd Test Day-2 Stumps : बुमराहने लाज राखली! पण ऑस्ट्रेलियाच वरचढ, ट्रॅविस हेड अन् स्टिव्ह स्मिथनं आणले नाकी नऊ; गाबा कसोटीत दुसऱ्या दिवशी काय घडलं?