TATA IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेचा 15 वा हंगाम आता दोन दिवसांवर आला आहे. येत्या 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळले जाणार आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झालीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकानं एकाला अटक केलीय. या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यानं वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल तसेच खेळाडूंचा हॉटेल ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली. यानंतर सर्व स्डेडियम आणि खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आलीय. दरम्यान, हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आलीय. खेळाडूंसह सामनाधिकारी, पंच आणि इतर कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे. तसेच पुढील धोका लक्षात घेता बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले.


आयपीएलच्या पंधराव्या हंगाम 26 तारखेपासून सुरु होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात होणार आहे. मुंबईच्या तीन स्डेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 20 सामने वानखेडे स्डेडियमवर खेळले जातील. तर, ब्रेबॉन स्डेडियममध्ये 15 आणि डीव्हाय स्डेडियमवर 20 सामने खेळले जाणार आहेत. इतर 15 सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्डेडियमवर होतील. या संपूर्ण कालावधीमध्ये खेळाडू तसंच आयपीएलच्या संबंधित सर्व व्यक्तींसाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha