Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai) एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी (Selfie) घेण्यावरुन गोंधळ झाला. यानंतर सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या लोकांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यासाठी हट्ट, हॉटेल मॅनेजरने दोघांना बाहेर काढलं


या प्रकरणात तक्रारकर्ता एक व्यापारी आणि क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा मित्र देखील आहे. सूत्रांनी सांगितलं की, दोघेही मुंबईच्या सहारा स्टार हॉटेलच्या मेंशन क्लबमध्ये गेले होते, तिथे हा वाद सुरु झाला. या प्रकरणातील आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉकडे क्लबजवळ सेल्फी घेण्याचा आग्रह केला होता. एकदा सेल्फी घेतल्यानंतर आरोपींना पुन्हा एकदा सेल्फी घ्यायचा होता. परंतु पृथ्वी शॉने नकार दिला. यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने दोन्ही आरोपींना हॉटेलबाहेर काढलं. 


पृथ्वीची कार समजून मित्राच्या कारला फॉलो, कार थांबवून काचा फोडल्या


यामुळे आरोपींना अतिशय राग आला आणि त्यांनी पृथ्वीच्या कारला फॉलो करण्यास सुरुवात केली. कार जोगेश्वरी लिंक रोडवरील लोटस पेट्रोल पंपाजावळ पोहोचली. त्याचवेळी आरोपींनी कारला रोखलं. यानंतर आरोपींनी बेस बॉल बॅटने कारच्या काचा फोडल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कारमध्ये पृथ्वी शॉ नव्हता. तो हॉटेलमधून दुसऱ्याच गाडीत बसून घराकडे रवाना झाला होता. ज्यावेळी कारवर हल्ला झाला होता तेव्हा त्यात पृथ्वी शॉचा मित्र होता.


प्रकरण दाबण्यासाठी आरोपींची पृथ्वीच्या मित्राला धमकी


इतकंच नाही तर आरोपींनी पृथ्वीच्या मित्राला धमकी दिली की, जर प्रकरणाची वाच्यता करायची नसेल तर 50 हजार रुपये दे नाहीतर खोट्या आरोपांखाली तुला अडकवू. यानंतर पृथ्वीचा मित्र हल्ला झालेली कार घेऊन ओशिवारा पोलीस स्टेशनला पोहोचला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 384,143, 148,149, 427,504, आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.


दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉची सध्या भारताच्या राष्ट्रीय संघात निवड झालेली नाही. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळालेली नव्हती.


हेही वाचा


Who is Nidhi Tapadia: जाणून घ्या कोण आहे 'ही' नाशिकची ब्युटी क्वीन, जिच्या प्रेमात पृथ्वी शॉ झाला क्लीन बोल्ड