India vs Australia 2nd Test : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून (शुक्रवार) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळवला जाणार आहे. नागपूर कसोटी (Nagpur Test) सामन्यात टीम इंडियाने कांगारु संघाचा एक डाव आणि 132 धावांनी धुव्वा उडवला. आता या सामन्यातही कांगारुंना चारीमुंड्या चीत करण्याचा रोहित ब्रिगेडचा प्रयत्न असेल. दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. 


श्रेयस अय्यरला संधी मिळणार?


कांगारुंविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या प्लेईंग-11वर खिळल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काय बदल होणार? कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झालं आहे, त्यामुळे संघ व्यवस्थापन श्रेयसचा थेट प्लेईंग-11 मध्ये समावेश करते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयस अय्यरचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला तर मात्र सूर्यकुमार यादवला दुसरा कसोटी सामना खेळता येणार नाही, त्याला बाहेर बसावं लागेल. नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातूनच सूर्याने कसोटीत पदार्पण केलं. मात्र, टी20 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करणाऱ्या सूर्याला कसोटी सामन्यात मात्र काही विशेष कामगिरी करता आली नाही. 


केएल राहुलवर असेल दडपण 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल आणि केएस भरत यांची बॅट फारशी चालली नाही. राहुलने 71 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा केल्या होत्या. तसेच, केएस भरतलाही केवळ 8 धावांचं योगदान देता आलं. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात या दोघांवरही धावांचा डोंगर रचण्याचं दडपण असणार आहे. पहिल्या कसोटीत संघात शुभमन गिलचा समावेश करण्यात आला नव्हता, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सामन्यात केएल राहुल आपला परफॉर्मन्स दाखवू शकला नाही, तर मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. 


अरुण जेटली स्टेडियमवरही टर्निंग पिच पाहायला मिळणार असल्याने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात बॉलिंग कॉम्बिनेशन कायम ठेवावं लागेल. म्हणजेच, टीम इंडियाच्या अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी त्रिकुटाकडे पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा धुव्वा उडवण्याची संधी आहे. म्हणजेच, याचाच अर्थ असाही होतो की, कुलदीप यादवला मात्र बेंचवरच वेळ घालवावा लागणार आहे. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे दोन वेगवान गोलंदाज संघाचा भाग असतील.


दिल्लीत टीम इंडियाचाच दबदबा 


1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता. 


दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज