Syed Mushtaq Ali Trophy 2022: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईनं हिमाचल प्रदेशचा तीन विकेट्सनं पराभव केला. या विजयासह मुंबईनं पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करत हिमाचल प्रदेशनं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून मुंबईसमोर 144 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईनं हा सामना 19.3 षटकात जिंकत इतिहास घडवला.
हिमाचल प्रदेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं तीन विकेट्स राखून हा सामना जिंकला आहे. दोन्ही संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. पण मुंबईनं विजेतेपदाची लढाई जिंकली. हिमाचलनं यापूर्वी विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. अशा परिस्थितीत हा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची शक्यता जास्त होती. परंतु, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत हिमाचलचा संघ चमत्कार करू शकला नाही.
हिमाचलचं मुंबईसमोर 144 धावांचं लक्ष्य
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिमाचल प्रदेशनं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून मुंबईसमोर 144 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दरम्यान, हिमाचल प्रदेशची पहिली विकेट्स 10 धावांवर असताना पडली. अंकुश बैंस अवघ्या चार धावा करून बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या सुमीत वर्माही (8 धावा) स्वस्तात माघारी परतला. यावेळी संघाची धावसंख्या 20 धावा होती. मात्र, निखिल गंगटानं 14 चेंडूत 22 धावा करत हिमाचलच्या डावाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही आठव्या षटकात बाद झाला. पन्नास धावांच्या आत हिमाचलचा अर्धासंघ माघारी परतला. मात्र, आकाश वशिष्ठ आणि एकांत सेन यांनी 60 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 118 धावांपर्यंत नेली. आकाश 22 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याचवेळी एकांत सेननं 29 चेंडूत 37 धावांचं योगदान दिलं होतं. अखेरच्या षटकात मयंक डागरनं 12 चेंडूत 21 धावा करत संघाची धावसंख्या 143 धावांपर्यंत पोहचवली. मुंबईकडून तनुष कोट्यान आणि मोहित अवस्थी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर, अमन हकीम खान आणि शिवम दुबे यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
मुंबईचा तीन विकेट्स राखून विजय
हिमाचलनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ 11 धावांवर बाद झाला. कर्णधार रहाणेनंही स्वस्तात माघारी परतला. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली. यानंतर जैस्वाल 28 चेंडूत 27 धावा आणि श्रेयस अय्यर 26 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. दरम्यान, चार विकेट्स पडल्यानंतर मुंबईच्या संघ डगमगायला लागला. शिवम दुबे सात, अमन हकीम सहा आणि शम्स मुलानी दोन धावांवर बाद झाला. मुंबईला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी 23 धावांची गरज होती आणि हिमाचलला सामना जिंकण्याची संधी होती. मात्र अभिनयने 19व्या षटकात 17 धावा दिल्या आणि सामना मुंबईच्या बाजूनं झुकला. या षटकात सर्फराजनं 15 धावा ठोकत मुंबईच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. अखेरच्या षटकात तनुष कोट्यानने पहिल्या दोन धावा घेतल्या आणि नंतर षटकार ठोकत मुंबईला चॅम्पियन बनवलं.
हे देखील वाचा-