मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. सोबतच तो ऑरगॅनिक अर्थात सेंद्रीय शेती करत असल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटसह इतर खेळांचं आयोजन सध्या थांबलं आहे. आयपीएल स्पर्धाही अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. महेंद्रसिंह धोनी तर शेती करताना दिसत आहे.
फार्म हाऊसमध्ये धोनीची शेती
आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी लॉकडाऊनपासूनच रांचीमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच फार्म हाऊसमध्ये शेती करण्यासाठी एक ट्रॅक्टर खरेदी केला होता. आता याच ट्रॅक्टरचा वापर तो सेंद्रीय शेतीसाठी करत आहे.
आठ लाखांचा ट्रॅक्टर
इन्स्टाग्रामवर 'धोनी भक्त' नावाच्या अकाऊंट हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये धोनी एकटा ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "सेंद्रीय शेतीची मजा लुटताना माही भाईचा एक्स्लूझिव्ह व्हिडीओ." धोनीने महिंद्राचा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदा केली होता, याची किंमत आठ लाखांच्या घरात आहे.
सोशल मीडियावर धोनीच्या हा व्हिडीओला फारच पसंती मिळत आहे आणि चाहते सातत्याने कमेंट्स करत आहेत. याशिवाय धोन बहुतांश वेळा फार्म हाऊसमध्ये मुलगी झिवासोबत बाईक रायडिंगही करतो.