नवी दिल्ली : भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) किंग कोहली (Virat Kohli ) सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भारताला महेंद्रसिंह धोनीनं 2007 चा टी 20 वर्ल्ड कप, 2011 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली आहे. महेंद्रसिंह धोनी कॅप्टन असताना विराट कोहलीनं 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पुढं 2015 पर्यंत विराट कोहली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात क्रिकेट खेळलं. धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर विराट कोहली कॅप्टन बनला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात महेंद्रसिंह धोनीनं आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी 2017 आणि वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये खेळला. या सर्व प्रवासाबद्दल महेंद्रसिंह धोनीनं आठवणी जागवल्या आणि अनुभव सांगितल्या.  


महेंद्रसिंह धोनी यानं विराट कोहलीबाबत बोलताना म्हटलं की, आम्ही दोघांनी अधिक काळ भारतासाठी क्रिकेट खेळलं आहे. विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहलीसोबत दीर्घकाळ फलंदाजी केली आहे. हा चांगला अनुभव आहे. आम्ही अनेकदा 2 आणि 3  रन धावून काढायचो. धोनी पुढं म्हणाला आम्ही सातत्यानं भेटत नाही. जेव्हा भेटण्याची संधी मिळते तेव्हा नक्की भेटतो. आम्ही एकमेकांसोबत हास्यविनोद करत असतो, अनेक गोष्टींवर चर्चा करतो. त्यावेळी जे मुद्दे असतात त्यावर चर्चा करतो. आमचे संबंध चांगले आहेत, असं असं धोनीनं म्हटलं.  


महेंद्रसिंह धोनी भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार


भारतानं आतापर्यंत चार वर्ल्ड कप जिंकले आहेत. भारतानं पहिला वनडे वर्ल्ड कप कपिल देवच्या नेतृत्त्वात 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं विजय मिळवला होता. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 2024 मध्ये भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं.  महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं 2013  मध्ये जिंकली होती.  धोनीच्या नेतृत्त्वात आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारतानं पहिलं स्थान मिळवलं. महेंद्रसिंह धोनीनं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 


दरम्यान, महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं  पाच वेळा विजेतेपद मिळवलं आहे.  


संबंधित बातम्या :


भारताची श्रीलंकेविरुद्ध एका रननं विजयाची संधी हुकली, मराठमोळ्या खेळाडूनं इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडला, VIDEO


Team India : शुभमननं जे केलं ती फक्त झलक, सर्वांना ते काम करावं लागणार, भारताच्या सहायक कोचचं सूचक वक्तव्य