Coronavirus : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा शिरकाव आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या घरातही झाला आहे. एमएस धोनीचे वडिल पान सिंह धोनी आणि आई देवकी सिंह धोनी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दोघांनाही झारखंडची राजधानी रांची येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या आयपीएल 2021 सुरु असून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीही आपल्या संघासोबत आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनीचे आई-वडील रांची येथील पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. धोनी यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2020 नंतर आपल्या कुटुंबियांसोबत रांची येथेच होता. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यांपूर्वी धोनीने कोणताच सामना खेळलेला नव्हता. 


धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नईचा संघ या सीझनमध्ये फॉर्मात दिसून येत आहे. चेन्नईने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी एका सामन्यात पराभव झाला असून दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नईचा पुढील सामना 15 मार्च रोजी कोलकातासोबत खेळवण्यात येणार आहे. 


देशात 24 तासांत 2023 रुग्णांचा मृत्यू, नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर


India Coronavirus Cases Today : देशभरात 13 कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तरिही कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नवनवे उच्चांक रचत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1,67,457 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी शनिवारी 259,167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 56 लाख 16 हजार 130
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 32 लाख 76 हजार 039 
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 21 लाख 57 हजार 538
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 82 हजार 553
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 1 लाख 19 हजार 310 डोस