मुंबई : खेळाडूंच्या खेळण्याच्या तंत्रात सातत्य असणं ही अत्यं महत्त्वाची बाब, क्रिकेटमध्ये तर याचं महत्त्वं अधिकच. अशीच सातत्यपूर्ण खेळी खेळत क्रीडारसिकांचं लक्ष वेधत आहे पृथ्वी शॉ. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूनं संघाच्या पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केली, दुसऱ्या सामन्यात तो प्रभावी खेळाचं प्रदर्शन करण्यावाचून चुकला. पण, तिसऱ्या सामन्यात त्यानं मोठी धावसंख्या उभी केली नसली तरीही संघाला आवश्यक त्या धावसंख्येची जोड मात्र दिली. 


विजय हजारे चषकामध्ये एकाच सत्रात 800 हून अधिक धावा करण्याचा विक्रम रचल्यानंतर पृथ्वी आयपीएलमध्ये सहभागी झाला. थोडक्यात काय, तर यंदाच्या वर्षाची सुरुवात त्याच्यासाठी दमदार राहिली. पण, वर्ष सुरु होण्याआधीचा काही काळ मात्र त्याच्यासाठी आव्हानाची परिस्थिती उभा करणारा ठरला होता. 


एडिलेडमध्ये भारत- विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 4,0 अशा धावसंख्येवर बाद होणाऱ्या शॉला संघातून वगळण्यात आलं होतं. हा तोच क्षण होता, जेव्हा भारतीय क्रिकेट संघात असूनही त्याला आपल्या खेळण्याच्या तंत्रावरच शंका येत होती, चिंता वाटू लागली होती. 


IPL 2021: कुटुंबाच्या मदतीसाठी 'या' खेळाडूनं सोडलेलं क्रिकेट


व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यानं याबाबतचा खुलासा केला. 'भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर संघातून वगळलो गेल्यानंतर मी माझ्यात तंत्राबाबत चिंता व्यक्त करु लागलो. सगळ्यांना दिसत होतं नेमकं काय घडत होतं, मी फक्त स्वत:लाच त्यासंदर्भातील खात्री करुन देत होतो. लहानातील लहान चुकीचा आणखी लहान कसं करता येईल यावरच मी भर दिला. माझ्या या त्रुटींवर काम केलं', असं तो म्हणाला. 


ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर प्रशांत शेट्टी आणि प्रवीण आम्रे या प्रशिक्षकांच्या मदतीनं पुन्हा एकदा नव्यानं आपल्या कौशल्यावर त्यानं काम केलं. विजय हजारे चषकापूर्वी आपल्या खेळण्याच्या पद्धतीवर काम करत नैसर्गिक पद्धतीनं जसं खेळाचं तंत्र आहे त्यातच आणखी भर टाकत त्यानं याच बळावर पुढे दमदार कामगिरी केली. 


एका खेळाडूच्या जीवनात अनेक आव्हानाचे प्रसंग येतात. पण, त्या प्रसंगांतही खचून न जाता खेळावरच लक्ष केंद्रीत करत ध्येयप्राप्तीच्या वाटेवर जाण्याचा संदेश पृथ्वी श़ॉनं त्याच्या या अनुभवातून दिला.