Most Runs As Indian Captain In T20 : अफगाणिस्तानविरोधात अखेरच्या टी 20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक ठोकले. रोहित शर्माने फक्त 69 चेंडूवर 121 धावांचा पाऊस पाडला. या शतकी खेळीमध्ये रोहित शर्माने 11 चौकार आणि आठ षटकार ठोकले. रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघ एकवेळ 4 बाद 22 अशा दैयनीय स्थितीत होता. रोहित शर्माने रिंकू सिंहच्या जोडीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने या शतकी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराट कोहलीचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला.


रोहित शर्माने किंग कोहलीचा विक्रम मोडला -


बेंगलोरमध्ये शतकी खेळी करत रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने माजी कर्णधार विराट कोहली याचाही विक्रम मोडीत काढला. रोहित शर्मा आता भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार झालाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहली आता दुसर्या क्रमांकावर घसरलाय. रोहित शर्माने टी 20 मध्ये कर्णधार असताना 1572 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कर्णधार असताना टी20 क्रिकेमध्ये 1570 इतक्या धावा ठोकल्या होत्या. आज हा विक्रम मोडीत निघाला. 


माजी कर्णधार धोनी कोणत्या क्रमांकावर - 


टी 20 कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झालाय. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली याचा क्रमांक लागतो. तर या यादीत माजी कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅप्टन कूल एमएस धोनी याने टी 20 फॉर्मेटमध्ये कर्णधार असताना 1112 धावा केल्या आहेत. 



रोहित शर्माचं पाचवं टी 20 शतक - 


कठीण परिस्थितीमध्ये रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. पण बेंगलोरच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही. रोहित शर्माने अफगणिस्तानच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतली. रोहित शर्माने 69 चेंडूमध्ये नाबाद 121 धावांची खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे. 


आणखी वाचा :


रोहितच्या उताऱ्यानंतर रिंकू सिंहचा तडाखा; शेवटच्या षटकात 36 कुटल्या अन् युवराजची सुद्धा आठवण!


विराट ढेपाळला,  रोहित एकटाच लढला, टी20 चं पाचवं शतक ठोकलं, अनेक विक्रम ध्वस्त