IND vs AFG 3rd T20I Innings Highlights: रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 212 धावांचा पाऊस पाडला. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी भारताच्या डावाला आकार दिला. एकवेळ भारत 4 बाद 22 अशा स्थितीत होता, पण तेथूनच रोहित आणि रिंकू यांचा शो सुरु झाला. या जोडीने शेवट तर अतिशय विस्फोटक केला. रिंकू आणि रोहित यांनी 20 व्या षटकांमध्ये तब्बल 36 धावा वसूल केल्या. यामध्ये पाच षटकारांचा समावेश आहे. रिंकू सिंह याने तर अखेरच्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत भारताची धावसंख्या 200 पार पोहचवली. करीम जनत याची रिंकू आणि रोहित शर्माने धुलाई केली. करीम जनत याच्या टी 20 करिअरमधील हे सर्वात महागडं षटक असेल. अखेरच्या षटकातील 36 धावांचा पाऊस पाहून चाहत्यांना युवराज सिंह याच्या 2007 विश्वचषकातील खेळीची आठवण झाली. युवराजने इंग्लंडविरोधात एकाच षटकात सहा षटकार ठोकत 36 धावा वसूल केल्या होत्या. पाहूयात अखेरच्या षटकातील सहा चेंडूत 36 धावा कशा निघाल्या.. 


अखेरच्या षटकात काय काय झालं? 


19.1 - रोहित शर्माने करिमच्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकला. 


19.2 - करीम याच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने षटकार मारला.. दबावात असणाऱ्या करिमचा हा चेंडू नो होता. त्यामुळे या चेंडूवर एकूण सात धावा मिळाल्या. 


19.2 - करीम याने रोहित शर्माला शॉर्ट लेंथ चेंडू टाकला. पण रोहित शर्माने हा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये पोहचवला. या चेंडूवर रोहित शर्माने सहा धावा वसूल केल्या. 


19.3 - यॉर्कर चेंडूवर रोहित शर्माने शॉर्ट थर्डवर एक धाव घेतली. 


19.4 - करीम याच्या स्लोअर चेंडूवर रिंकू याने मिडविकेटवर षटकार ठोकला. 


19.5 - दबावात असणाऱ्या करीम याने रिंकूला फुलटॉस चेंडू फेकला. या संधीचं रिंकूने सोनं केले... रिंकूने फुलटॉस चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला. 


19.6 - रिंकू सिंह याने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. 



अखेरच्या पाच षटकात 103 धावांचा पाऊस 


रोहित शर्मा आणि रिंकू सिंह याने अखेरच्या पाच षटकात 103 धावांचा पाऊस पाडला. 16 व्या षटकात 22 धावा लुटल्यानंतर या जोडीने पुढील चार षटकातही पाऊस पाडला. 17 व्या षटकात 13, 18 व्या षटकात 10, 19 व्या षटकात 22 आणि 20 व्या षटकामध्ये 36 धावा लुटल्या.