IND vs AFG 3rd T20 Score Live: बेंगलोरच्या मैदानावर रोहित शर्माने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. खराब सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्माने डाव सावरला. रिंकू सिंह याला साथीला घेत रोहित शर्माने खिंड लढवली. रोहित शर्माने 64 चेंडूत शतकाला गवसणी घातली. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवं शतक ठोकले. रोहितच्या शतकाच्या बळावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. रोहित शर्माने आपल्या शतकी खेळीत सहा षटकार आणि दहा चौकार लगावले. टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरलाय. 


भारताचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या 22 धावांत तंबूत परतल्यामुळे रोहित शर्माने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने पहिल्या 34 चेंडूमध्ये फक्त 28 धावा चोपल्या होत्या. पण त्यानंतर रोहितने प्रत्येक चेंडू फटकावला. रोहितने अखेरच्या 35 चेंडूमध्ये 93 धावांची लूट केली. रोहित शर्माच्या फलंदाजीपुढे अफगाणिस्तानचा संघ ढेपाळलेला दिसला.


 रोहित शर्माचं पाचवं टी 20 शतक - 


कठीण परिस्थितीमध्ये रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. पण बेंगलोरच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही. रोहित शर्माने अफगणिस्तानच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतली. रोहित शर्माने 69 चेंडूमध्ये नाबाद 121 धावांची खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे. 


रोहितनं रिंकूसोबत डावाला दिला आकार 


अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 22 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर अनुभवी रोहित शर्माने सर्व सुत्रे हातात घेतली. युवा रिंकू सिंह याला हाताशी धरत रोहित शर्माने भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली. दोघांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने द्वशतकी धावसंख्या उभारली. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, त्यानंतर अफगाण गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मा आणि रिंकू यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 190 धावांची भागिदारी झाली. त्यांनी अवघ्या 96 चेंडूत 190 धावा जोडल्या. यामध्ये रोहित शर्माने 113 आणि रिंकूने 69 धावांचे योगदान दिले. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांच्यापुढे अफगाण गोलंदाजी कमकुवत जाणवली