Mohammed Siraj DSP : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याची तेलंगणा सरकारकडून डीएसपी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मोहम्मद सिराजची डिसीएसपी म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा याच वर्षी जुलै महिन्यात करण्यात आली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मोहम्मद सिराज हा नोकरासाठी रुजू देखील झाला होता. भारताने टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर तेलंगणा सरकारने मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीसोबतच 600 यार्डचा भूखंड देण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद सिराज डिएसपी बनला हे सर्वश्रूत झाले आहे. मात्र, त्याला पगार किती मिळतो हे जाणून घेऊयात...


मोहम्मद सिराजचं वेतन 58,850 ते 1,37,50 रुपयांदरम्यान असणार


इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, डीएसपी झाल्यानंतर मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) वेतन 58,850 ते 1,37,500 रुपयांदरम्यान असणार आहे. पगारासोबतच सिराजला वैद्यकीय, प्रवास आणि घरभाडे यासाठी वेगळे भत्ते देखील मिळणार आहेत. डीएसपी पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी कमीत कमीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असते. मात्र सिराजने केवळ 12 वीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. या संदर्भात तेलंगणा सरकारने एक निवेदन जारी करून मोहम्मद सिराज यांना सूट देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.


मोहम्मद सिराजसाठी बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम


बीसीसीआयच्या 2024 च्या कॉन्ट्रॅक्टनुसार, मोहम्मद सिराजचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये मानधन मिळते. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने त्याला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.






सिराजपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील जोगिंदर शर्माला डीएसपी पदावर नियुक्ती देण्यात आली होती. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही पंजाबमध्ये डीएसपी पदावर कार्य केले  आहे. दुसरीकडे, 2022 राष्ट्रकुल क्रीडा आणि 2023 आशियाई खेळांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर दीप्ती शर्माला यूपी पोलिसांत डीएसपी पद मिळाले होते.  दरम्यान, मोहम्मद सिराज सध्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय