मोहम्मद सिराजचे मोठी झेप, वनडे क्रमवारीत थेट अव्वल स्थान पटकावले
ODI Ranking Bowler : आशिया चषकाच्या फायनल सामन्यात आग ओकणाऱ्या मोहम्मद सिराज याने आणखी एक पराक्रम केला आहे.
Mohammed Siraj Becomes The Number 1 ODI Ranking Bowler : आशिया चषकाच्या फायनल सामन्यात आग ओकणाऱ्या मोहम्मद सिराज याने आणखी एक पराक्रम केला आहे. विश्वचकाआधी मोहम्मद सिराज वनडेमध्ये एक नंबर गोलंदाज झालाय. आयसीसीने वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांची क्रमवारी जारी केली. मोहम्मद सिराज याने आठ क्रमांकाने झेप घेतली. आशिया चषकातील फायनलमध्ये सिराज याने २१ धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या होत्या. सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंका संघाने ५० धावांत गुडघे टेकले होते. याच कामगिरीचा फायदा सिराजला झालाय.
आशिया चषकाला सुरुवात होण्यापूर्वी मोहम्मद सिराज 643 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत नवव्या क्रमांकावर होता. आशिया चषकात भेदक मारा केल्याचा फायदा सिराजला झाला. ताज्या क्रमवारीनुसार त्याने 8 स्थानांनी झेप घेत पहिले स्थान मिळवले आहे. सिराजचे आता 694 रेटिंग गुण आहेत. आशिया कप स्पर्धेमध्ये सिराजने 12.2 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या होत्या. याआधी मोहम्मद सिराज मार्च 2023 मध्ये वनडे क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचला होता, त्यानंतर जोश हेजलवुडने त्याला त्या स्थानावरून हटवले होते. आता पुन्हा एकदा सिराजने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी मोहम्मद सिराजची ही कामगिरी टीम इंडियासाठी मोठा दिलासा मानली जाऊ शकते. बुमराह आणि सिराज या जोडीचा सामना आशिया चषक स्पर्धेत कोणत्याही संघासाठी सोपा वाटला नाही. सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकदिवसीय कारकिर्दीतील 50 बळीही पूर्ण केले. आता विश्वचषकात सिराज पुन्हा भेदक मारा करेल, अशी आपेक्षा चाहत्यांना आहे.
Back to the 🔝
— BCCI (@BCCI) September 20, 2023
Congratulations to @mdsirajofficial on becoming the No.1️⃣ ranked bowler in ICC Men's ODI Bowler Rankings 👏👏#TeamIndia pic.twitter.com/ozlGmvG3U0
तर वनडे फलंदाजीत गिल होणार नंबर १
आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. पण भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल याने रेटिंग गुणातील अंतर कमी केले आहे. बाबर आझमच्या नावावर सध्या 857 रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अणाऱ्या गिलकडे 814 रेटिंग गुण आहेत. दोघांमध्ये फक्त 43 रेटिंग गुणांचा फरक आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत गिल याच्याकडे क्रमांक एकचा फलंदाज होण्याची संधी आहे. तीन वनडे सामन्यात शुभमन गिल याने २०० धावा केल्यास तो आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचू शकतो. दरम्यान, वनडे क्रमवारी विराट कोहली सध्या आठव्या क्रमांकावर विराजमान आहे.