Mohammad Amir Retirement : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे, कारण गेल्या 24 तासात 2 स्टार खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने निवृत्ती जाहीर केली. आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. आमिरच्या एक दिवस आधी पाकिस्तानचा फिरकी अष्टपैलू इमाद वसीमनेही निवृत्ती जाहीर केली होती.
आमिरने 3 वर्षात दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती
मोहम्मद आमिरची गेल्या 3 वर्षांतील ही दुसरी निवृत्ती आहे. त्याने 2021 मध्ये पहिल्यांदा निवृत्तीची घोषणा केली होती, त्यानंतर मार्च 2023 मध्ये तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. आता निवृत्तीनंतर 21 महिन्यांनी परतल्यानंतर त्यांनी पुन्हा निवृत्तीची घोषणा केली आहे.
निवृत्तीची घोषणा करताना डावखुरा पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर लिहिले की, खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. हे करणे सोपे नव्हते. पाकिस्तान क्रिकेटच्या हितासाठी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे, जेणेकरून नवीन प्रतिभावान आणि तरुणांना पुढे येऊन देशासाठी खेळण्याची संधी मिळू शकेल. क्रिकेटमध्ये मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. यामध्ये पीसीबी, माझे कुटुंब आणि मित्रांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.
आमिरने 2009 मध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 271 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेऊन निवृत्ती घेतली आहे. त्याने 36 कसोटी सामन्यात 119 तर 61 एकदिवसीय सामन्यात 81 विकेट घेतल्या आहेत. तो पाकिस्तानच्या 2009 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. मात्र, 2010 मध्ये इंग्लंडमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.
लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार सलमान बटकडून सूचना मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक ओव्हरस्टेप केले. 'न्यूज ऑफ द वर्ल्ड'ने उघडकीस आणल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, ज्यामुळे तिन्ही आरोपी आमिर, बट आणि मोहम्मद आसिफ यांना यूकेमध्ये काही काळ तुरुंगात जावे लागले.
नंतर आयसीसीने तिघांवरही बंदी घातली. आमिरला 5 वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. 2016 मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावून स्वतःला सिद्ध केले.
2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतही तो खेळला आणि त्याच्या देशासाठी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज बनला. पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) प्रशासनाशी मतभेद झाल्यानंतर आमिरने डिसेंबर 2020 मध्ये पहिली निवृत्ती जाहीर केली आणि मार्च 2024 मध्ये त्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतला. पण आता पुन्हा एकदा त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
हे ही वाचा -